`सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न अनैतिक`
जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय.
नवी दिल्ली : जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय. कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता येऊ नये म्हणून काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. तसंच कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. २२२ आमदरांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज आहे. आपल्याकडे ११७ आमदार असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी बोलवावं अशी मागणी काँग्रेस आणि जेडीएसनं राज्यपालांकडे केली आहे. तर भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांनी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावं अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. आता राज्यपाल याबद्दल काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.