Threat to Amit Shah: पंजाबमधील 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहच्या (Khalistani Supporter Amritpal Singh) समर्थकांनी गुरुवारी जोरदार गोंधळ घातला. अमृतपालाचा सहकारी लवप्रीत तुफानच्या (Lavlit Tufan) अटकेच्या विरोधात त्याच्या समर्थकांनी अजनाला पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलन करत पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यादरम्यान सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान अमृतपाल सिंहने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना धमकी दिली आहे. अमित शाह यांनी खलिस्तानी (Khalistani) आंदोलन पुढे जाऊ देणार नाही असा उल्लेख केला होता. इंदिरा गांधींनीही (Indira Gandhi) असंच काहीसं म्हटलं होतं. पण जर तुम्हीही तसंच केलं तर त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा अमृतपाल सिंहने दिला आहे. जर गृहमंत्री हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांनाही असंच म्हणाले, तर ते गृहमंत्रीपदावर कसे राहतात हे मी पाहतो असंही त्याने म्हटलं. 


"जर लोक हिंदू राष्ट्राची मागणी करु शकतात, तर मग आम्ही खलिस्तानची मागणी का करु शकत नाही? माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी खलिस्तानचा विरोध केल्याची किंमत मोजली होती. आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, मग ते मोदी असो, अमित शाह किंवा भगवंत मान," असंही त्याने म्हटलं. 


अमृतपाल सिंगने याआधीही एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांना धमकावलं होतं. "पंजाबमधील पत्येक मुलगा खलिस्तानबद्दल बोलत आहे. इंदिरा गांधींनी आवाज दाबला असता काय झालं हे सर्वांना माहिती आहे. अमित शाह यांनीही आपली इच्छा पूर्ण करावी. आम्ही आमच्या राज्याची मागणी करत आहोत, दुसऱ्याच्या नाही," असं त्याने म्हटलं होतं. 


गृहमंत्री अमित शाह यांनी खलिस्तानी समर्थकांसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली होती. पंजाबमधील खलिस्तानी समर्थकांवर आपली नजर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.


पोलीस स्थानकावर हल्ला


अजनाला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गोळा झालेल्या अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी तलवारी आणि बंदुका हातात घेऊन पोलिसांनी प्रवेशबंदीसाठी ठेवलेले बॅरिकेड्स तोडले. समर्थकांनी अमृतपाल सिंगचा निकटवर्तीय लवप्रीत तूफानच्या अटकेविरोधात पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता. याच मोर्चाला नंतर हिंसक वळण लाभलं.


अमृतपाल सिंगचं नाव पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सूरी हत्याकांड प्रकरणामध्ये समोर आलं होतं. सुधीर सूरी यांच्या कुटुंबियांनी हत्याकांड प्रकरणामध्ये अमृतपाल सिंगच्या नावाचाही समावेश करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख असलेल्या अमृतपाल सिंगला मोगा येथील सिंगावाला गावामध्ये नजरकैद केलं आहे. अमृतपाल सिंग जालंदरमधील विशाल नगरला किर्तनासाठी रावाना होणार होता. तेव्हाच पोलिसांनी गुरुद्वारेजवळ अमृतपालला नजरकैद केलं.