Milk Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता आणखी एका कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. परिणामी आता नागरिकांना जादा पैसे मोजून दूध खरेदी करावे लागणार आहे.  
 
यामध्ये पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड (Milkfed Punjab) ने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मिल्कफेड वेरका (Verka) या ब्रँड नावाने दुग्धजन्य पदार्थ विकते. अमूल आणि मदर डेअरीच्या दरात वाढ केल्यानंतर मिल्कफेडने हे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर सांची फुल क्रीम मिल्क (गोल्ड)चे अर्धा लिटर पॅकेट आता २९ ऐवजी ३० रुपयांना मिळणार आहे.  एका लिटरच्या पॅकेटची किंमत ५७ रुपयांवरून ५९ रुपये करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिल्कफेडने जारी केलेल्या निवेदनात एका अधिकाऱ्याने सांगितले की, 19 ऑगस्टपासून दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढतील. यापूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. 17 ऑगस्टपासून दूध नवीन दराने उपलब्ध होणार आहे. अमूल गोल्ड दुधाचा भाव आता 61 रुपये प्रति लिटर झाला आहे, जो पूर्वी 59 रुपये प्रति लिटर होता. 


सहा महिन्यांत दुसऱ्यांदा वाढले दर -


कंपन्यांकडून गेल्या सहा महिन्यांत दुधाचे दर वाढविण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मार्चमध्ये कंपन्यांनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली होती. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) ने सांगितलं की, अहमदाबाद आणि सौराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबईमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, 2 रुपये प्रति लिटर दरवाढीमुळे MRP (कमाल किरकोळ किंमत) मध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी सरासरी अन्न महागाईपेक्षा कमी आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने सांगितले की, एकूण ऑपरेशन आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किंमती वाढल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ पशुखाद्याचा खर्च सुमारे 20 टक्क्यांनी वाढला आहे.