उत्तर प्रदेशातील झांशी येथे कामाच्या अतिताणामुळे 42 वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुण सक्सेना हे बजाज फायनान्समध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करत होते. तरुण सक्सेना यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून, यामध्ये आपल्या वरिष्ठांवर आरोप केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वरिष्ठ टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असून, पगार कापला जाईल अशी धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बजाज फायनान्सने मात्र या आरोपांवर अद्याप भाष्य केलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोलकरणीला घऱामध्ये तरुण सक्सेना यांचा मृतदेह आढळला. त्यांनी पत्नी आणि मुलांना दुसऱ्या रुममध्ये लॉक केलं  होतं. त्यांच्या मागे आई-वडी, पत्नी मेघा आणि दोन मुलं आहेत. तरुण सक्सेना यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पाच पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आपण सर्वेतोपरी प्रयत्न करुनही टार्गेट पूर्ण करु शकत नसल्याने प्रचंड तणावात असल्याचं म्हटलं आहे. 


तरुण यांना त्यांच्या परिसरातून बजाज फायनान्सच्या कर्जाचे ईएमआय जमा करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं, परंतु अनेक समस्यांमुळे त्यांचं टार्गेट पूर्ण होत नव्हतं. आपली नोकरी गमवावी लागेल अशी भीती वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. वरिष्ठांनी आपला वारंवार अपमान केल्याचंही ते म्हणाले आहे. "मी भविष्याबद्दल खूप तणावात आहे. मी माझी विचार करण्याची क्षमता गमावली आहे. मी जात आहे," असं त्यांनी लिहिलं आहे.


तरुण यांनी सांगितलं की, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या परिसरातून वसूल न करू शकलेल्या ईएमआयसाठी पैसे भरण्यास सांगितलं होतं. वसुली करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी वरिष्ठांकडे वारंवार मांडल्या, पण ते ऐकायला तयार नव्हते, असंही त्यांनी लिहिलं आहे. "मी 45  दिवस झोपलो नाही. मी फार कमी वेळा जेवलो आहे. मी खूप तणावाखाली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक माझ्यावर कोणत्याही किंमतीत टार्गेट पूर्ण करण्यासाठी किंवा नोकरी सोडण्यासाठी दबाव आणत आहेत," असं त्यांनी लिहिलं आहे. 


वर्षअखेरीपर्यंत आपल्या मुलांच्या शाळेची फी भरली आहे असं सांगत तरुण यांनी आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. "तुम्ही सर्वजण मेघा, यथार्थ आणि पिहूची काळजी घ्या. मम्मी, पापा, मी कधीच काही मागितले नाही, पण आता माहत आहे. कृपया दुसरा मजला बांधा जेणेकरून माझे कुटुंब आरामात राहू शकेल," असं ते म्हणाले आहेत.


त्यांनी आपल्या मुलांना चांगले अभ्यास करण्यास आणि त्यांच्या आईची काळजी घेण्यास सांगितलं आहे. त्यांनी आपल्या नातेवाईकांना विम्याचे पैसे मिळतील याची खात्री करण्यास सांगितलं आहे. त्यांनी आपल्या वरिष्ठांची नावंदेखील घेतली आणि आपल्या कुटुंबियांना त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यास सांगितले. "ते माझ्या निर्णयाला जबाबदार आहेत," असा आरोप त्यांनी केला आहे. 


वरिष्ठ पोलीस अधिकारी विनोद कुमार गौतम यांनी पोस्टमार्टमची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे. "सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी दबाव आणत होते असं सांगितलं आहे. जर आम्हाला कुटुंबाकडून तक्रार आली तर आम्ही कारवाई करू," असं ते म्हणाले आहेत.