भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या योगी सरकारच्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. श्रीधर वेंबू 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. यावेळी त्यांची आई मंदिरात आपलं पाकिट विसरल्या होत्या. या पाकिटात पैसे तसंच महत्त्वाची कागदपत्रं असल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. पण विशेष सुरक्षा दलामुळे त्यांना अनपेक्षित सुखाचा धक्का मिळाला आणि ते भारावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष सुरक्षा दलाचे निरीक्षक मानवेंद्र पाठक आणि उप निरीक्षक ओंकारनाथ त्रिपाठी यांनी ही पर्स सापडली. त्यांना पर्स उघडून पाहिली असता त्यात 66 हजार 290 रुपये रोख, आधार कार्ड आणि पूजेचं साहित्य होतं. पर्समधील आधार कार्ड तपासलं असता पोलिसांना त्याचा मालक कोण आहे याची माहिती मिळाली. पण तोपर्यंत वेंबू कुटुंब तामिळनाडूत आपल्या घऱी पोहोचलं होतं. 


वेंबू कुटुंबाने विशेष सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना रामनगरीत थांबलेले आपले नातेवाईक एस निवास यांचा मोबाईल क्रमांक दिला. तसंच पर्स त्यांच्याकडे सोपवा अशी विनंती केली. यानंतर बुधवारी राम मंदिरात दाखल झालेल्या एस निवास यांच्याकडे एसएसएफ प्रभारी यशवंत सिंह यांनी पर्स सोपवली.


विशेष सुरक्षा दलाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक


यशवंत सिंह यांनी सांगितलं की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या विशेष पाहुण्यांमध्ये श्रीधर वेंबू होते. चार्टर्ड अकाउंटंट एस निवास यांनी सांगितलं की, श्रीधर वेंबू हे तंजावरजवळील टेनकासी येथील रहिवासी आहेत. वेंबू कुटुंबाने राम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचं कौतुक केले आहे. एसएसएफचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा असल्याचं ते म्हणाले आहेत. 



पर्समध्ये पूजेसाठी वापरण्यात येणारी एक छोटी घंटा होती, जी श्रीधर वेंबू यांच्या आई जानकी यांच्यासाठी खूप प्रिय आहे. ही घंटी परत मिळाल्याने त्या फार आनंदी आहेत. 


श्रीधर वेंबू यांना देशात आदराने पाहिलं जातं. याचं कारण अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्यासाठी ते भारतात परतले. येथे त्यांनी झोहो नावाची सॉफ्टवेअर सोल्युशन्स सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी सुरू केली. आपण भारतात राहूनच व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांनी कोणत्याही मेट्रो शहरात आपलं ऑफिस सुरु न करता गावातच कार्यालय सुरु केलं आणि कोट्यावधींची कंपनी सुरु केली. देशातील मोजक्या श्रीमंत उद्योजकांमध्ये त्यांची गणना होते.