Anand Mahindra Shares Viral Video of Waiter: महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच सक्रीय असतात. ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून ते अनेकदा प्रोत्साहन देणारे, मनोबल वाढवणारे कोट्स किंवा फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. आनंद महिंद्रांचे ट्वीट नेहमीच काहीतरी संदेश देणारे असल्याने उद्योगक्षेत्रासह इतरांचं त्याकडे लक्ष असतं. दरम्यान नुकतंच आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला असून युजर्सलाही तो भावतो आहे. याचं कारणही तसंच आहे. या व्हिडीओत एक वेटर हातात एक, दोन नव्हे तर तब्बल 16 प्लेट्स उचलून चालताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ 2 मिनिटं 20 सेकंदांचा आहे. या व्हिडीओची सुरुवात किचनमधून होते, जिथे डोसे तयार केले जात आहेत. डोसे तयार झाल्यानंतर ग्राहकांसाठी ते प्लेटमध्ये ठेवण्यात येतात. यानंतर तिथे उभा वेटर त्या प्लेट्स उचलतो आणि इथेच तुम्ही आश्चर्यचकित होता. कारण वेटर एक, दोन नव्हे तर अगदी सहजपणे 16 प्लेट्स हातात उचलतो आणि ग्राहकांच्या टेबलापर्यंत जाऊन देतो. 


वेटर ज्या सहजतेने 16 प्लेट्स हातात उचलत घेऊन जातो यावरुन बरीच वर्षं तो हे काम करत असल्याचं स्पष्ट होतं. हा व्हिडीओ पाहून फक्त आनंद महिंद्राच नाही तर नेटकरीही भारावले आहेत. 


आनंद महिंद्रा यांनी 31 जानेवारीला हा व्हिडीओ शेअर केला असून 'आपण वेटर प्रोडक्टिविटीला ऑलिम्पिकमधील खेळ म्हणून ओळख मिळवून देण्याची गरज आहे. या खेळात ही शानदार व्यक्ती नक्कीच सुवर्णपदाकाचा दावेदार असेल' असं लिहिलं आहे. 



या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज असून 32 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने हे गजब टॅलेंट असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने याला म्हणतात कामाप्रती प्रेम अशी कमेंट केली आहे. दरम्यान एका युजरने प्लेट्सचा खालील भाग स्वच्छ असावा असं सांगत डोशाला प्लेटचा स्पर्श होत असल्याने नाराजी जाहीर केली. 


दरम्यान काहींनी हे हॉटेल नेमकं कुठे आहे हे सांगितलं आहे. हे बंगळुरुमधील विद्यार्थी भवन हॉटेल आहे. मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?