Anand Mahindra: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आनंद महिंद्रा नेहमीच नवीन टॅलेंटची दखल घेत असतात. तसेच नेटकऱ्यांच्या प्रश्नांना ते आपल्या अंदाजात उत्तरं देतात. त्याचबरोबर झणझणीत डोळ्यात अंजन घालणारे पोस्ट देखील करत असतात. या माध्यमातून नेटकऱ्यांना संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उद्योगपती आनंद महिंद्र यांचं असंच एक ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हटल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या 62व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्या नावावर हजारो कोटींची संपत्ती आहे. खरंतर राकेश झुनझुनवाला यांच्या जाण्यानं शेअर मार्केटमधील एका युगाचा अंत झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिंद्रा यांनी एक फोटो शेअर केला असून त्यात लिहिले आहे की, "राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले की, त्यांची सर्वात वाईट गुंतवणूक हे त्यांचे आरोग्य आहे. एका मुलाखतीत राकेश झुनझुनवाला म्हणाले होते की, मी प्रत्येकाला त्यांच्या आरोग्यावर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो." 



आनंद महिंद्रा यांनी फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राकेशने आतापर्यंतचा सर्वात मौल्यवान आणि फायदेशीर गुंतवणूक सल्ला दिला. आपण सगळेच पैसे कमावण्यासाठी रोज मेहनत करतो आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे एकवेळ पैसा जमा होतो पण या पैशाचा आनंद घेण्यासाठी चांगले आरोग्य राहत नाही."


आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर केलेली पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलेल्या पोस्टला हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर 9 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.