Anantnag Encounter : मागील सहा दिवसांपासून जम्मू काश्मीर येथील अनंतनाग मध्ये असणाऱ्या कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत लष्कराचा संघर्ष सातव्या दिवशीही सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. 145 तासांहूनही अधिक काळापासून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर करडी नजर ठेवून आहे. पण, त्यातही क्रूर मानसिकतेचे हे दहशतवादी लष्कराला शरण येताना दिसत नाहीयेत. आता त्यांच्यावर आघात करण्यासाठी लष्करानं अंतिम आणि काही आक्रमक आघात करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार सध्या संरक्षण दलानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी खास सापळा रचला आहे. ज्याअंतर्गत जवान कासवगतीनं पुढे सरकत असून टप्प्याटप्प्यानं दहशतवाद्यांच्या नजीक पोहोचत आहेत. या सापळ्यात पुढे जात असतानाच लष्कराच्या जवानांच्या हाती एका दहशतवाद्याचा मृतदेह लागला. मृतदेह बऱ्याच अंशी जळलेल्या अवस्थेच असल्यामुळं आता तो डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, आता जंगलामध्ये आणखी दोन दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आतापर्यंत या चकमकीमध्ये लष्कराचे दोन अधिकारी, जम्मू काश्मीर पोलिसातील डीवायएसपी आणि एका जवानाला वीरमरण आलं. त्यामुळं या शहिदांच्या त्यागाचा सूड घेत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी म्हणूनच लष्कर प्रयत्नशील दिसत आहे. 


संघर्ष केव्हा सुरु झाला? 


अनंतनागमध्ये असणाऱ्या कोकरागच्या गडोल वनांमध्ये (मागील आठवड्यात) मंगळवारी रात्री दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु झाली. त्या क्षणापासून देशात अशांतता पसरवू पाहणाऱ्या या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला घटनास्थळी लष्कराच्या विशेष तुकड्या आणि श्वानपथकंही तैनात करण्यात आली आहे.


हेसुद्धा वाचा : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयानंतर तुमच्या खात्यात जमा होणार पैसे


 


सैन्यासाठी बूबी ट्रॅप धोक्याचा... 


लष्कराला निशाण्यावर घेण्यासाठी दहशतवादीसुद्धा एक सापळा रचतात जिथं ते अशी रचना करतात की ज्या मार्गावरून संरक्षण दल पुढे जाणार आहे तिथंच दारुगोळा दडवला जातो, काही स्फोटकं दिसणार नाहीत अशा पद्धतीनं ठेवली जातात. अनेकदा ग्रेनेडची पिन काढून त्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवली जाते. किंवा मृत दहशतवाद्याच्या शरीरावर स्फोटकं बांधली जातात. जसजसं लष्कर शत्रूला संपवण्यासाठी पुढे येतं तसतसा या स्फोटकांचा स्फोटो होतो आणि लष्करालाही माघार घ्यावी लागते.