नवी दिल्ली : कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात बळींचा आकडा २१ केला आहे. राज्यात ३६ तासांत ८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यत वाढ दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर जगभरात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. आतापर्यंत १० लाख जणांना लागण तर ५० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत सर्वाधिक १३ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे तर अमेरिकेत एकाच दिवसात हजारावर बळी गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे काश्मीरच्या दुर्गम भागात अन्नधान्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन लष्कराने जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात अन्नधान्यचा पुरवठा सुरू केला आहे. स्थानिक युनिट्समधून गाड्यांमधून धान्याची पोती घेऊन जाऊन आर्मीचे जवान वाटप करत आहेत. सैनिकांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय. गव्हाचं पीठ, तांदुळ या अन्नधान्यांचं वाटप इथे गावागावात केलं जातंय. भारत पाकिस्तान सीमेवर सध्या लॉकडाऊनमुळे गावांमधली दुकानं बंद आहेत. मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी कोणतीही वाहनं नाहीत. त्यामुळे सीमावर्ती भागातल्या ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. 


गाझियाबादच्या एमजीएम रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन संशयित रुग्णांवर गुन्हा दाखल केलाय. तबलिगी जमातसाठी निझामुद्दीन मरकजमध्ये आलेल्यांपैकी हे दोघे गाझियाबाद रुग्णालयतील नर्सेससमोर अश्लील वर्तन करत असल्याचं तक्रारीत म्हटलंय. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद इथं तबलिगी जामतीच्या काही संशयितांना एमएमजी रुग्णालायत क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. मात्र या संशयितांनी रुग्णालयातील नर्स सोबत असभ्य वर्तवणूक केल्याबद्दल त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.  


देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ३३ टक्के बससेवा सुरु आहे. मात्र शंभर टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलवलं जात आहे. सर्वच बस डेपो मध्ये कर्मचारी वर्ग बसून आहे. मात्र यामुळे डेपोत कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनानेच सोशल डिस्टंन्सिंगची ऐशीतैशी केली आहे. सर्व बस डेपोंमध्ये हीच परिस्थिती दिसून येत आहे.