चित्तूर : तिरुपती येथील गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मौल्यवान मुकुट चोरीला गेल्याची घटना घडली आहे.  सोन्याचे आणि हिरेजडित असे हे अतिशय मौल्यवान  मुकुट चोरीला गेल्याचं लक्षात येताच रविवारपासून मंदिर प्रशासन आणि परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. या तिनही मुकुटांचं वजन हे जवळपास १.३ किलोग्रॅम इतकं असल्याचं कळत आहे. 'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार तिरुपती तिरुमाला देवस्थानमच्या सुरक्षा रक्षकांनी हे मुकुट व्यंकटेश्वर, श्री महालक्ष्मी आणि श्री पद्मावती या देवतांच्या मूर्तींचे असल्याची माहिती दिली. ज्या मंदिरात ही चोरी झाली आहे, ते बाराव्या शतकातील मंदिर असल्याची माहिती मंदिर अधीक्षक ज्ञान प्रकाश यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी प्रसाद वाटपाच्या वेळी ही चोरी झाल्याचा संशय मंदिर प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रसाद वाटपाच्या वेळेत सायंकाळी ५ वाजल्यापासून, ते ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येतं. याचदरम्यान, जेव्हा पूजारी म्हणून मंदिरात काम पाहणाऱ्या हरिकृष्ण दीक्षितुलू यांनी विजयसारादी या पुजाऱ्यांकडून मंदिराची जबाबदारी स्वीकारली तेव्हा मुकूट चोरीला गेल्याची बाब त्यांच्या नजरेत आली. ज्यानंतर त्यांनी लगेचच संबंधित कार्यकारिणीला याविषयीची माहिती देत पोलिसांत तक्रार दाखल केली. 


सध्याच्या घडीला समोर येणाऱ्या माहितीनुसार मलयप्पा, श्रीदेवी आणि भोदेवी या देवतांच्या मुर्तीवरी मुकुटांचं वजन अनुक्रमे ५२८ ग्रॅम, ४०८ ग्रॅम आणि ४१५ ग्रॅम इतकं आहे.  मंदिरातील या चोरीचं कृत्य पाहता सीसीटीव्ही फूटेज आणि इतर सर्व मार्गांनी चोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. या प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली असली तरीही अद्यापही कोणालाच अटक करण्यात आलेली नाही.