अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झाले
विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या वतीने गॅरेंटर म्हणून रिलायन्स पॉवरच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. परिणामी कंपनी 3,872.04 कोटींच्या कर्जातून मुक्त झाली आहे.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळाली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्क्यांनी वाढून 32.98 रुपयांवर पोहोचले आहेत. रिलायन्स पॉवरने वीजनिर्मिती कंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (VIPL) साठी हमीदार म्हणजेच गॅरेंटर म्हणून आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. 17 सप्टेंबरला कंपनीने याची घोषणा केली आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्सवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरवर 3872.04 कोटींचं कर्ज होतं. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 4 वर्षात 2800 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बँका आणि आर्थिक संस्थांचं कोणतंही कर्ज नाही
अनिल अंबानींची मालकी असलेल्या कंपनी रिलायन्स पॉवरने (Reliance Power) आता त्यांच्यावर कोणत्याही बँक आणि वित्तीय संस्थांचं कर्ज नसल्याची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितलं की, 30 जून 2024 पर्यंत एकत्रित आधारे त्यांची नेटवर्थ 11,155 कोटी आहे. रिलायन्स पॉवरने एक्स्चेंज फायलिंगमध्ये सांगितलं आहे की, विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड आता त्यांची उपकंपनी राहिलेली नाही. आपण सीएफएम रिकंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडसह सर्व वाद मिटवले असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या साडे चार वर्षात 2818 टक्क्यांची वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स 18 सप्टेंबर 2024 रोजजी 32.98 रुपयांवर पोहोचले. जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असतील, आणि ते कायम ठेवले असतील तर सध्याच्या घडीला त्या 1 लाखांच्या शेअर्सचं मूल्य 29.18 लाख रुपये असेल. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यातील सर्वाधिक मूल्य 38.07 रुपये राहिले. तसंच 15.53 रुपये सर्वात निचांकी मूल्य राहिलं.
एका वर्षात शेअर्समध्ये 73 टक्क्यांची वाढ
रिलायन्स पॉवर्सच्या शेअर्समध्ये एका वर्षात 73 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर 18 सप्टेंबर 2023 पर्यंत 19.7 रुपयांवर होता. रिलायन्स पॉवरचे शेअर्स 18 सप्टेंबर 2024 रोजी 32.98 रुपयांवर पोहोचले. गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 42 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे शेअर्स या घडीला 23.23 रुपयांपासून वाढून 33 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.