लालू यादवांना आणखी एक झटका, मेहुणे चंद्रिका राय जेडीयूमध्ये प्रवेश करणार
बिहार विधानसभा निवडणुकीआधी लालू यादवांना आणखी एक झटका
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता लालू प्रसाद यादव यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे मेहुणे चंद्रिका राय हे राष्ट्रीय जनता दल सोडून जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत. चंद्रिका राय यांच्यासोबत इतर २ आमदार देखील जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत. गुरुवारी हे तीनही आमदार जेडीयूमध्ये प्रवेश करु शकतात.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रिका राय यांच्यासह फराज फात्मी आणि जयवर्धन यादव हे देखील जेडीयूमध्ये जाणार आहेत.
चंद्रिका राय छपराच्या पारसा विधानसभा मतदारसंघातून आमदार असून त्यांनी फेब्रुवारीमध्येच आरजेडी पक्षाला रामराम केला होता. चंद्रिका राय लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांचे सासरे आहेत. अलीकडेच तेज प्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांच्यातील संबंध बिघडल्यामुळे चंद्रिका राय यांनी आरजेडी सोडली होती.
चंद्रिका राय हे जेडीयूमध्ये जाणार असल्याची शक्यता बऱ्याच दिवसांपासून वर्तवली जात होती. मात्र आता गुरुवारी ते जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
चंद्रिका राय यांच्यासह जयवर्धन यादव जे पाटण्यातील पालीगंज विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते देखील जेडीयूमध्ये प्रवेश करतील. तसेच दरभंगाच्या केवटी येथील आरजेडीचे आमदार फराज फात्मी हे देखील जेडीयूमध्ये जाणार आहेत. फराज फात्मी हे आरजेडीचे माजी खासदार आणि एकेकाळी लालूंचे निकटवर्ती असलेले अशरफ अली फात्मी यांचे पूत्र आहेत.
फराझ फात्मी यांच्यासह प्रेमा चौधरी आणि महेश्वर यादव यांनाही पक्षाने काही दिवसांपूर्वी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी महेश्वर यादव आणि प्रेमा चौधरी जनता दल युनायटेडमध्ये दाखल झाले.