राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा; जो घाबरतो तोच धमकावतो, देशात हुकूमशाही राजवट
Rahul Gandhi On Inflation Protest : देशात हुकूमशाही राजवट आहे. लोकांचे प्रश्न आणि महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार यावर आवाज उठवता कामा नये, असा सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
नवी दिल्ली : Rahul Gandhi On Inflation Protest : देशात हुकूमशाही राजवट आहे. लोकांचे प्रश्न आणि महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार यावर आवाज उठवता कामा नये, असा सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसने 70 वर्षांत जे कमावले ते 8 वर्षांत संपले, असा निशाणा राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर साधला.
केंद्र सरकारवर जोरदार निशाणा
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महागाई आणि GST विरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने 70 वर्षांत जे कमावले ते 8 वर्षांत संपले. देशात हुकूमशाही राजवट आहे. देशात लोकशाहीची हत्या होत आहे. आम्हाला बोलण्यापासून रोखले जात आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही महागाईचा मुद्दा मांडत आहोत, पण आम्हाला बोलू दिले जात नाही, असा हल्लाबोल आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही महागाईचा मुद्दा मांडत आहोत. जो घाबरतो तो धमकावतो, असे राहुल गांधी म्हणाले. आपण लोकशाहीचा मृत्यू पाहत आहोत. जवळपास शतकापूर्वीपासून भारताने बांधलेल्या विटा आणि दगड तुमच्या डोळ्यासमोर नष्ट होत आहेत. हुकूमशाहीच्या प्रारंभाच्या कल्पनेच्या विरोधात जो कोणी उभा राहतो त्याच्यावर हल्ला केला जातो, तुरुंगात टाकले जाते, अटक केली जाते आणि मारहाण केली जाते, ते म्हणाले.
लोकांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार यावर आवाज उठवता कामा नये, असा सरकारचा एकमेव अजेंडा आहे आणि 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार हा अजेंडा चालवत आहे. ही हुकूमशाही दोन ते तीन मोठ्या व्यावसायिकांच्या हितासाठी दोन लोक चालवत आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता गेला.
लोकशाहीचा मृत्यू आपण पाहत आहोत. जवळपास शतकापूर्वीपासून भारताने जे उभारले आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होत आहे. सुरु असलेल्या या हुकूमशाही विरोधात जो कोणी उभा राहतो त्याच्यावर हल्ले केले जातात, तुरुंगात टाकले जाते, अटक केली जाते आणि मारहाण केली जाते, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.
आपण लोकांचे प्रश्न मांडत राहणार आहे. प्रत्येकाला ते माहित आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्पनेला विरोध करणे हे माझे काम आहे आणि मी ते करणार आहे. मी हे जितके जास्त करत राहिन तितके माझ्यावर हल्ले केले जातील, माझ्यावर तितके कठोर आक्रमण केले जाईल. मी आनंदी आहे, माझ्यावर हल्ला करा, असे थेट आव्हान राहुल गांधी यांनी सरकारला दिले आहे.