सुवर्ण मंदिरात देश विरोधी घोषणा, खलिस्तान जिंदाबादचे नारे
शींख धर्मात सर्वात पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आज पुन्हा एकदा खलिस्तान चळवळीच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. तर देशविरोधी नारे देण्यात आले.
अमृतसर : शींख धर्मात सर्वात पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आज पुन्हा एकदा खलिस्तान चळवळीच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. तर देशविरोधी नारे देण्यात आले.
आजच्याच दिवशी ३३ वर्षांपूर्वी ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात आला होता. यावेळी जरनेलसिंह भिंदरनवालेच्या नेतृत्वात शीख धर्मियांसाठी वेगळ्या पंजाबची मागणी करण्यासाठी खलिस्तान चळवळ उभारण्यात आली होती. खलिस्तानसाठी भारत सरकारविरोधात बंड पुकारणारे हजारो दशहतवादी भिंद्रनवालेच्या आश्रयानं हत्यारांसह सुवर्णमंदिरात तळ ठोकून होते.
खलिस्तान चळवळ मोडून काढायची असेल, तर भिंदरनवालेला बाहेर काढून त्याला अटक करणे अत्यावश्यक होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारची परवानगी दिली. पाच आणि सहा जून 1984 ला लष्करानं कारवाई केली ज्यामध्ये भिंदरनवाले मारला गेला. मोठ्याप्रमाणात रक्तपात झाला.
सुवर्णमंदिराचंही मोठं नुकसान झालं. या घटनेला ३३ वर्ष पूर्ण झाली. याचनिमित्त सुवर्णमंदिरात हा कारक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या वेळी काही खलिस्तान समर्थकांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.