उन्नाव : उत्तरप्रदेशातील उन्नाव तुरुंगातील एक धक्कादायक चित्र समोर आलंय. उन्नाव तुरुंगातील कैद्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत. उन्नाव तुरुंगात शिक्षा भोगणारे काही कैदी हातात बंदुका घेऊन फोटोसेशल करताना या फोटो आणि व्हिडिओत दिसत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तुरुंगातील कैद्यांकडे बंदुक कशी पोहचली? आणि हे कैदी सोशल मीडियाचा वापर कसा करत आहेत? यासारख्या अनेक प्रश्नांमुळे तुरुंगाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षा भोगणारे हे कैदी आपल्या बरॅकमध्ये पार्टी करतानाही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुरुंगातील अधिकाऱ्यांना मात्र उत्तरं देणं कठिण होऊन बसलंय. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तुरुंग अधिक्षक ए के सिंह आणि जेलर बृजेंद्र सिंह यांना बेजबाबदार ठरवून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 


समोर आलेल्या व्हिडिओत दोन सराईत गुन्हेगार तुरुंगात खुल्लमखुल्ला बंदूक घेऊन फोटोसेशल करताना दिसत आहेत. यातील उन्नाव तुरुंगात कैद असलेला एक गुन्हेगार अमरेश याला ३१ मार्च २०१७ रोजी मेरठ तुरुंगातून उन्नाव धाडण्यात आलं होतं. तो आयपीसी ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यासोबतच त्याच्यावर आणखी दोन गंभीर गुन्हेही दाखल आहेत. तर दुसरा गुन्हेगार देवेंद्र प्रताप गौरव याला ११ फेब्रुवारी २०१७ रोजी लखनऊहून उन्नावला धाडण्यात आलं होतं. गौरवही आयपीसी ३०२ (हत्या) प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.


व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे दोघेही आरोपी योगी सरकारला थेट आव्हान देताना दिसत आहेत. मेरठ असो वा उन्नाव... राज्यातील कुठल्याही तुरुंगाला आपण आपलं कार्यालय बनवू, असंही ते या व्हिडिओत म्हणताना बंदुकीसह दिसत आहेत.