मंडी (हिमाचल प्रदेश) : देशभरात सुरु असणारा शंडीचा कडाका हा दिवसागणिक वाढत चालला आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये याचे थेट परिणाम दिसून येऊ लागले आहे. रस्ते वाहतूक, हवाई वाहतुकीपासून स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावरही याचे थेट परिणाम झाले आहेत. इतकंच नव्हे तर, यामुळे लष्करातील जवानानांही काही अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जम्मू- काश्मीर येथे लष्कराच्या सेवेत रुजू असणाऱा आणि मुळचा हिमाचल प्रदेशचा असणारा एक जवान खोऱ्यात झालेल्या अतिबर्फवृष्टीमुळे त्याच्या स्वत:च्याच लग्नाला पोहोचू शकलेला नाही. अतिबर्फवृष्टी झाल्यामुळे तो तिथेच अडकला आणि लग्नाचा मुहूर्त टळला. 


सुनील कुमार असं त्या जवानाचं नाव. हिमाचलमधी खेईर नावाच्या गावातील तो मूळ रहिवासी. १६ जानेवारीला त्याचं लग्न होणार होतं. पण, त्यासाठी तो काही वेळेवर पोहोचू शकला नाही. 'माझ्या भावाचं लग्न १६ जानेवारीलाच होणार होतं. पण, हवामान खराब झाल्यामुळे तो निर्धारित विमानाने येऊच शकला नाही. त्याची वरात निघणारच होती. पण, तो वेळेवर येऊच शकला नसल्यामुळे आम्ही हा विवाहसोहळाच रद्द केला', अशी माहिती सुनील कुमार यांच्या भावाने दिली.


छाया सौजन्य- एएनआय

 



सध्य़ाच्या घडीला जवानाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आपण मंगळवारपर्यंत घरी पोहोचणार असल्याचं खुद्द सुनील कुमार यांनी सांगितलं. ज्यानंतर आता वधू आणि वरपक्षाच्या कुटुंबीयांकडून एखादा चांगला मुहूर्त ठरवून हा विवाहसोहळा पार पडेल.