नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताकडून बालाकोट परिसरात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाक यांच्यातील सीमारेषेवरचा तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार वायूदलाच्या मुख्यालयातील युद्धनिपूण अधिकारी सीमाभागातील लष्करी फौजेत तैनात करण्यात आले आहेत. तसेच संरक्षण मंत्रालयाकडून यासाठी नव्या पदाची ( Deputy Chief of Army Staff Strategy))निर्मिती करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, वायूदलाच्या मुख्यालयातील २२९ अधिकाऱ्यांना सीमारेषेवरील सैनिकी युनिटसमध्ये पाठवण्यात येईल. सध्या सीमारेषेवर तैनात असणाऱ्या वायूदलाच्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के इतके आहे. गेल्या बऱ्याच काळापासून मुख्यालयातील अधिकाऱ्यांना सीमारेषेवर तैनात करण्याची मागणी प्रलंबित होती. 


भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरुन केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तानने नुकतेच तिरिक्त सैन्य तसेच लष्करी साहित्य अफगाणिस्तानच्या सीमेवरून काश्मिरातील नियंत्रण रेषेजवळ संवेदनशील ठिकाणी हलवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे भारताकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यासाठी लष्करी तुकड्यांमध्ये वायूदलाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. सीमारेषेवरील फिल्ड युनिटसचा विचार करायचा झाल्यास सध्या येथील सैनिकांचे प्रमाण एकूण क्षमतेच्या ५० टक्केच आहे. त्यामुळे या युनिटसमध्ये वायूदल अधिकाऱ्यांच्या समावेश झाल्यास त्यांची ताकद नक्कीच वाढेल. सध्या लष्कराच्या मुख्यालयात कर्नल पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांची संख्या ११०० च्या घरात आहे. यापैकी २० टक्के अधिकारी प्रत्यक्ष युद्धभूमीवर तैनात असतात. युद्धाच्यावेळी हेच अधिकारी सैन्याचे नेतृत्त्व करतात. त्यामुळे हे अधिकारी प्रत्यक्ष युद्धभूमीवर असणे अधिक श्रेयस्कर आहे. जेणेकरून भारतीय लष्कराची क्षमता आणखी वाढेल, असे सूत्रांनी सांगितले.