हैदराबाद: सध्या देशभरात विविध यंत्रणांकडून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सर्वेक्षण केले जात आहे. यापैकी हैदराबादमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर शहरातील तब्बल सहा लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) संस्थेकडून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी शहरातील सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता गेल्या ३५ दिवसांत हैदराबादमधील तब्बल सहा लाख लोकांना कोरोना झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाबाधित व्यक्तींच्या विष्ठेतही विषाणूचे अंश असतात. त्यामुळे जगभरात अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या नमुन्यांवरून कोरोनाची साथ कितपत पसरली आहे, याचा अंदाज घेतला जात आहे. हैदराबादमध्येही असाच प्रयोग करण्यात आला होता. 

हैदराबादमध्ये दिवसाला जवळपास १८०० दशलक्ष लीटर पाण्याचा वापर केला जातो. यापैकी ४० टक्के पाण्याचे नंतर वेगवेगळ्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर शुद्धीकरण केले जाते. याच केंद्रांतून कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये जवळपास दोन लाख लोकांच्या विष्ठेत कोरोनाचे विषाणू आढळल्याचे समोर आले आहे. मात्र, हैदराबादमधील एकूण पाण्याच्या वापरापैकी केवळ ४० टक्केच सांडपाणी या केंद्रांमध्ये येते. त्यामुळे उर्वरित ६० टक्के सांडपाण्यातही कोरोनाचे अंश उपलब्ध असण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा विचार करता हैदराबादमध्ये जवळपास ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याच अंदाज CCMB ने वर्तविला आहे. हे प्रमाण हैदराबादच्या एकूण लोकसंख्येच्या सहा टक्के इतके आहे. 

महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी सिरो सर्व्हे केले जात आहेत. यापैकी जुलै महिन्यात मुंबईतील काही वॉर्डांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती झोपडपट्टीतील ५७ टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष समोर आला होता. तर इमारतींमध्ये राहणाऱ्या १६ टक्के जणांना कोरोना झाल्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती.