नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार घेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती शुक्रवारी आणखीनच खालावली आहे. ९ ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांचे पथक सातत्याने अरूण जेटली यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसांपासून ते उपचारांना साथही देत होते. मात्र, आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज एम्समध्ये जाऊन अरूण जेटलींची भेट घेतील. 


अरूण जेटलींनी ९ ऑगस्टला एम्समध्ये दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांची भेट घेतली होती. 


सूत्रांच्या माहितीनुसार, अरूण जेटली यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे समजते. जेटली यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होत असल्याने त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. याशिवाय, त्यांना पेशींचा कर्करोग झाला आहे. 


गेल्या काही वर्षांमध्ये जेटली यांच्या प्रकृतीमध्ये सातत्याने चढउतार सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर काही दिवसांतच त्यांना पेशींचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. या सगळ्यामुळे जेटली यांनी सार्वजनिक जीवनापासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती. त्यांनी यंदा लोकसभा निवडणुकही लढवली नव्हती.