नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुटकेवरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत. लष्कर-ए-तोयबाचा कोणताही कमांडर फार काळ जिवंत राहणार नाही अशा शब्दांत जेटलींनी हाफिजच्या सुटकेचा निषेध केलाय. हाफिजच्या सुटकेनंतर जगभरातून पाकिस्तानचा निषेध झाला, असेही त्यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. हाफिज सईदची नजरकैदेतून मुक्तता करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.


मात्र पाकिस्तान सरकारची ही भूमिका दहशतवाद्यांना पाठीशी घालणारी आहे, अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानं नापसंती व्यक्त केलीय. संयुक्त राष्ट्रसंघानं बंदी घातलेल्या सईदसारख्या दहशतवाद्याला मोकाट सोडणं योग्य नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सुनावलं.


हाफीज सईदने दिली धमकी


काश्मीरसाठी आपण उठवत असलेला आवाज बंद करण्यासाठी मला अटक करण्यात आली होती. मात्र, काश्मिरी जनतेसाठी आपण संपूर्ण पाकिस्तानातून लोकं जमा करू आणि काश्मिरींच्या स्वातंत्र्याचं लक्ष्य गाठू अशी धमकी हाफीज सईदने दिली आहे.


अमेरिकेनंही व्यक्त केली चिंता


हाफीज सईदला मुक्त केल्यानंतर घरासमोर जमलेल्या नागरिकांसमोर त्याने भाषण दिलं. हाफीज सईदच्या सुटकेनंतर अमेरिकेनंही चिंता व्यक्त केली आहे.


अमेरिकेने पाकिस्तानला दिला दम


दहशतवादी हल्ले करुन अमेरिकी नागरिकांसह शेकडो निष्पाप लोकांच्या मृत्यूला हाफीजची संघटना कारणीभूत ठरलीय. त्यामुळे पाकिस्तानने त्याला तात्काळ अटक करुन गुन्हे दाखल करावेत असा दम अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे.


पाकिस्तान सरकारला पुरावे देण्यास अपयश


जानेवारी २०१७ मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात यावी अशी मागणी करत न्यायालयात पुरावे देण्यास पाकिस्तान सरकारला अपयश आलं. त्यानंतर न्यायालयाने हाफिज सईदची सुटका करण्याचे आदेश दिले.