केजरीवाल यांची भेट घेणार कमल हसन, काय साऊथमध्ये ‘आप’ एन्ट्री होणार?
आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज(२१ सप्टेंबर)ला चेन्नईमध्ये अभिनेता कमल हसन यांना भेटणार आहेत. या बातमीनंतर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज(२१ सप्टेंबर)ला चेन्नईमध्ये अभिनेता कमल हसन यांना भेटणार आहेत. या बातमीनंतर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
चर्चा आहे की, कमल हसन लवकरच नवी इनिंग खेळण्यासाठी राजकीय आखाड्यात उडी घेतील. यासोबतच अशीही चर्चा आहे की, ही भेट यशस्वी ठरली तर कमल हसन हे नवा पक्ष काढण्याचा विचार सोडून साऊथमध्ये आम आदमी पार्टीचे नेते होऊ शकतात.
याआधी १५ सप्टेंबरला बातमी होती की, कमल हसन हे सप्टेंबरच्या शेवटी नव्या पक्षाची घोषणा करू शकतात. सूत्रांच्या हवाल्याने मीडियात बातमी होती की, कमल हसन तामिळनाडूत नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या स्थानिक निवडणुकींमध्ये त्यांचे समर्थक उतरवू शकतात. कमल हसन यांनीही एका वॄत्तवाहिनीशी बोलताना मान्य केलं होतं की, ते नवीन पक्ष काढणार आहेत.
६२ वर्षीय कमल हसन म्हणाले होते की, ‘होय, मी या दृष्टीने विचार करत आहे. पण हा विचार मला मजबूरीने करावा लागत आहे. कारण सध्या असा कोणता पक्ष आहे, जो सुधारणावादी उद्देश पूर्ण करण्यासाठी प्लॅटफॉर्म किंवा विचारधारा प्रदान करतात?’
दरम्यान, साऊथमध्ये सिनेमातील कलाकार हे नेहमीच राजकारणात यशस्वी होताना दिसले आहेत. कमल हसन यांच्यासोबतच अभिनेते रजनीकांत हे देखील राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.