कोरोनाशी केरळची झुंज ठरतेय यशस्वी; रुग्णसंख्या नियंत्रणात
प्रशासनाच्या प्रयत्नांना इथे यश येताना दिसत आहे.
तिरुवअनंतपूरम : चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोना Coronavirus व्हायरसने साऱ्या जगात थैमान घातलं आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या चिंताजनक आकडा गाठत आहे. तर, दुसरीकडे या विषाणूची लागण झाल्यामुळे कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
मानवी जीवनावरच आघात करणाऱ्या या विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून भारतातही पाहायला मिळत आहे. याचाच प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुन देशात लॉकडाऊन लागू झाला. सर्वत्र या लॉकडाऊनचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्यामध्ये प्रतितबंधात्मक उपाय, सतर्कता आणि निर्देशांचं पालन करत आता केरळ या राज्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहे.
रविवारी म्हणजेच १२ तारखेला kerala केरळमध्ये कोरोनाचे फक्त २ नवे रुग्ण आढळले. तर, ३६ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्येच असल्याचं उघड झालं होतं. ज्यानंतर मुख्यमंत्री पीनरई विजयन यांच्या सरकारकडून या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली गेली. परिणामी केरळमध्ये तब्बल १७९ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अवघी १९४ इतकी असल्याचं कळत आहे. केरळने कोरोनाला आतापर्यंत दिलेली झुंज पाहता साऱ्या देशापुढे या राज्याने आदर्श प्रस्थापित केला आहे.
अनेक ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट असतानाही केरळमध्ये रुग्णांची संख्या ही एकअंकी वाढताना दिसली. सध्याच्या घडीला भारतात एकंदर चित्र पाहता दर १०० रुग्णांमागे ९ रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. पण, केरळचा विचार केल्याच येथील रुग्णसंख्येच्या तुलनेत तब्बल ४८ टक्के रुग्ण आतापर्यंत घरी परतले आहेत ही प्रशंसनीय आणि तितकीच सकारात्मक बाब आहे.
केरळमधीलच एका अधिकाऱ्यांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली. पण, यातही कोरोना प्रभावित देशातून परतल्याचा इतिहास असलेलेच रुग्ण आढळले होते. सध्या केरळमध्ये कोरोनाचे जे रुग्ण आढळत आहेत ते या परदेशातून परतलेल्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झालेली नाही हे आता उघड झालं आहे. त्यामुळे सध्या केरळ प्रशासनाकडून परदेशातून परतलेल्यांचीच कोरोना चाचणी करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे.
केरळच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित रुग्ण हे तीन आठवड्यांच्या कालावधीत बरे होत आहेत. वुहानमधून परतलेल्यांना मात्र यातून सावरण्यासाठी महिनाभराचा काळ लागला होता हेसुद्धा खरं. थोडक्यात, स्वयंशिस्त, प्रशासनाला नागरिकांचं मिळालेलं सहकार्य या बळावर आज केरळ देशभरात कोरोनाशी आपली झुंज एका यशस्वी मार्गाने नेताना दिसत आहे. महाराष्ट्रातही जनतेने पूर्ण सहकार्य केल्यास कोरोनावर मात करणं सहज शक्य होणार आहे.
#घरीराहा_सुरक्षितराहा