नवी दिल्ली:  राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचा विचार करता डॉ. मनमोहन सिंग हेच सर्वार्थाने उजवे पंतप्रधान आहेत, असे मत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी दिल्लीत पार पडलेल्या व्ही.सी. पद्मनाभन स्मृती जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी प्रणब मुखर्जी यांनी म्हटले की, २००४ ते २०१४ हा देशातील सर्वात अस्थिर असा राजकीय कालखंड होता. मात्र, या काळात  पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीच देशाला स्थैर्य मिळवून दिल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९१ ते १९९९ या आठ वर्षांत देशात एकच सार्वत्रिक निवडणूक होणे, अपेक्षित होते. मात्र, राजकीय अस्थिरतेमुळे या काळात तीनदा निवडणुका झाल्या. हीच परिस्थिती १९८९ ते १९९९ या कालखंडावर नजर टाकल्यासही पाहायला मिळेल. या काळात तीनदा सार्वत्रिक निवडणुका होणे, अपेक्षित होते. मात्र, या काळात पाचवेळा सरकार बदलले. या पार्श्वभूमीवर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती.


देशात एक स्थिर सरकार आणणे आणि लोकांचे जीवमनान सुधारण्यासाठी ठोस निर्णय आणि कायदे आणण्याची गरज होती. माहिती अधिकार कायदा, अन्नसुरक्षा, रोजगार हमी कायदा प्रत्यक्षात आणून डॉ. मनमोहन सिंग यांनी ती गरज पूर्ण केली. हे कायदे अस्तित्त्वात येण्याचे श्रेय नक्कीच कोणा एका व्यक्तीला देता येणार नाही. मात्र, त्यांच्याच काळात या अधिकारांना कायद्याच्या आणि संसदेच्या पातळीवर मंजुरी मिळाली, याकडे प्रणब मुखर्जींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


याशिवाय, राजकीय परिस्थितीचा विचार करता डॉ. मनमोहन सिंग यांनी घटक पक्षांनाही उत्तमपणे सांभाळले. त्यावेळी लोकसभेत काँग्रेसचे १४७ खासदार होते. मात्र, तरीही डॉ. मनमोहन सिंग यांनी चोखपणे आणि कार्यक्षमरित्या घटकपक्षांना सांभाळले. अनेकजण याचे साक्षी आहेत, मीदेखील त्यांच्यापैकी एक असल्याचे प्रणब मुखर्जी यांनी सांगितले. याशिवाय, अत्यंत खडतर परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला तोलून धरल्याबद्दलही मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांचे कौतूक केले.