पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीला न बोलावल्यानंतर ओवेसी म्हणाले...
भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली.
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीचं आमंत्रण न मिळाल्यामुळे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी चांगलेच भडकले आहेत. बैठकीला न बोलावल्यामुळे नाराज झालेल्या ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं आहे.
'चीनच्या सीमाप्रश्नावर आज तुम्ही बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला एमआयएमला आमंत्रण देण्यात आलं नाही, ज्याचं अध्यक्षपद तुम्ही भुषावणार होतात. ही गोष्ट अत्यंत निराशाजनक आहे,' असं ओवेसी मोदींना पाठवलेल्या या पत्रात म्हणाले आहेत.
एमआयएमशिवाय आरजेडी आणि आम आदमी पक्षालाही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. बैठकीला न बोलावल्याबद्दल आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, 'चीनविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे.'
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही बैठकीला न बोलावल्याबद्दल नाराजी जाहीर केली. 'आम्हाला संरक्षण मंत्र्यांकडून याचं कारण समजलं पाहिजे. गलवान मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक आहे. तरीही बैठकीला आरजेडीला बोलावण्यात आलं नाही,' असं ट्विट तेजस्वी यादव यांनी केलं.
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित राहणार आहेत.