जकार्ता: भारताचा नेमबाजी दीपक कुमार याने सोमवारी १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. मात्र, भारताच्या रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दीपकने २४७.१ गुण कमवत रौप्यपदक स्वत:च्या नावावर केले. 
 
आशियाई स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस असून दीपक कुमारच्या कामगिरीमुळे भारताची सुरुवात चांगली झाली आहे. दीपकला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत पदक मिळाले आहे. यापूर्वी पात्रता फेरीत दीपकला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 
 
 यावेळीही अंतिम फेरीत दीपक स्पर्धेतून बाद होणार होता. मात्र, त्याने जोरदार पुनरागमन करत ताइवान शु शाओचुआनला मागे टाकले. तर चीनच्या के यांग हाओरान सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 
 
 आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानविरूद्ध विजयी सुरूवात केली आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने महिली एकेरीच्या लढतीत जपानच्या अकाने यामागुचीवर 21-18, 21-19 असा विजय साजरा करून भारताला आघाडी मिळवून दिली आहे.