नवी दिल्ली : दिल्लीतील लोधी इस्टेट येथे बंगला रिकामा करण्यासाठी केंद्राकडून नोटीस मिळाल्यानंतर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आता नवीन राजकीय हालचाली करण्याच्या विचारात आहेत. प्रियंकाच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, त्या आता उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होतील. त्या लखनऊमधील बंगल्यात राहतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश राज्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रियंका आता लखनऊमध्ये राहण्याबाबत तयारी करत आहेत. त्या लखनऊमधील 'कौल हाऊस' मध्ये शिफ्ट होतील, अशी अपेक्षा आहे. हा बंगला इंदिरा गांधी यांची मावशी शीला कौल यांचा आहे. शीला कौल केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री देखील होत्या आणि कॉंग्रेसच्या त्या लोकप्रिय नेत्या होत्या. दरम्यान, लखनऊमधील 'कौल हाऊस' च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.


प्रियंका गांधी-वाड्रा यांचा दिल्ली ते लखनऊ हा प्रवास महत्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीपूर्वी लखनऊमध्ये राहून त्यांना उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. यामुळे त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.  लग्नानंतर इंदिरा गांधी पती फिरोज गांधी यांच्यासमवेत लखनऊला आल्या होत्या. चारबाग रेल्वे स्थानकाजवळील एपी सेन रोडवरील बंगल्यात राहत त्या राहत होत्या.


दरम्यान, प्रियंका गांधी-वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका गांधी-वाड्रा यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. ६-बी हाऊस नंबर- ३५ लोधी एस्टेटमध्ये प्रियंका गांधी या त्यांच्या कुटुंबासोबत राहत आहेत.