`पत्नीला घरातील कामं करायला सांगणं क्रूरता नाही!` हायकोर्ट म्हणालं, `बऱ्याच घरात पती..`
Household Chores Marital Cruelty: या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र पतीने केलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळली अन् पतीची बाजू घेत निकाल दिला. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.
Household Chores Marital Cruelty: घटस्फोट घेणं ही हल्ली पूर्वीसारखी फार दुर्मिळ बाब राहिली नाही. आपला जोडीदारासंदर्भातील निर्णय चुकला आहे असं वाटल्यास हल्ली अनेकजण विभक्त होण्याचा मार्ग स्वीकारतात. मात्र कधीतरी घटस्फोटासाठी दिलं जाणार कारण खरच हे कारण एवढं गंभीर आहे का असा प्रश्न विचारायला भाग पाडतं. असाच काहीसा प्रकार नुकताच दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान घडला. पतीने घरातील कामं करण्यास सांगितल्याने घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला. 'पतीने पत्नीकडून घरातील कामं करण्याची अपेक्षा ठेवल्यास त्याला क्रूरता म्हणता येणार नाही,' असं कोर्टाने सुनावणीदरम्यान निरिक्षण नोंदवताना म्हटलं आहे.
घरातील कामं सांगणं क्रूरता नाही
एखाद्या महिलेला तिच्याच घरातील काम करण्यास सांगितलं तर याचा अर्थ तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली जात आहे असा घेता येणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. बऱ्याच घरांमध्ये पती घराच्या आर्थिक जबाबदाऱ्या प्रामुख्याने उचलून धरतात तर पत्नी घरातील कामांची जबाबदारी स्वीकारते. घटस्फोटाची मागणी करणाऱ्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कुमार कैत आणि न्यायमूर्तकी नीना बंन्सल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवलं आहे.
कोर्टाने पतीची याचिका केली मान्य
आपल्याला घरातील कामं करायला सांगणं ही क्रूरता असल्याचा दावा अर्जदार महिलेने केला होता. घरातील कामं करायला सांगतात म्हणून मला घटस्फोट हवा असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं. मात्र कौटुंबिक न्यायालयाने या महिलेची याचिका फेटाळली होती. मात्र आता पतीनेच पत्नीची आपल्याबरोबरची वागणूक चुकीची असल्याचा दावा करत घटस्फोट मागितला आहे. न्यायालयाने पतीची घटस्फोटाची मागणी मान्य केला आहे. 2007 पासून हे दोघे विवाहबंधनात असून दोघांना एक 17 वर्षांचा मुलगाही आहे.
पत्नीने काय काय केलं, पतीनेच वाचला पाढा
पतीने कोर्टासमोर आपली बाजू मांडताना पत्नीची वागणूक ही मानसिक छळ केल्यासारखी होती असं म्हटलं आहे. माझी पत्नी कुटुंबातील इतर सदस्यांशी नेहमी भांडायची. कुठल्याही गोष्टीवर आमचं एकमत होत नसते. त्यामुळे घरात कायम तणावाचं वातावरण असायचं. अनेकदा तर ती वेगळं राहण्याचीही मागणी करायची, असं पतीने म्हटलं. पत्नीची मागणी मान्य करत पती तिच्याबरोबर वेगळा राहू लागला. मात्र त्यानंतर पत्नी स्वत: तिच्या आई-वडिलांबरोबर माहेरी राहू लागल्याचंही पतीने म्हटलं आहे. मात्र पती कायम कामानिमित्त घराबाहेर असतो असं सांगत आपल्या माहेरी राहण्याच्या भूमिकेचं समर्थन केलेलं. मात्र महिलेचं हे वागणं चुकीचं असल्याचा शेरा न्यायालयाने दिला. वारंवार वेगवेगळी कारणं देत ही महिला सासरचं घऱ सोडून पतीबरोबर वेगळं राहू लागली आणि नंतर स्वत: आई-वडिलांबरोबर माहेरी जाऊन राहू लागली. हे अयोग्य आहे, असं न्यायालयाने म्हटलं.
...म्हणून घटस्फोट करतोय मान्य; कोर्टाने सांगितलं कारण
वैवाहिक संबंधांना सुदृढ करण्यासाठी पती-पत्नीने एकत्र राहायला हवं. कायम वेगळं राहणं हे वैवाहिक नात्यासाठी धोकादायक आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पत्नीला पतीबरोबर एकत्र कुटुंबात राहायचं नसल्याचं दिसत आहे. तिने यामुळेच स्वत:च्या वैवाहिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या नाहीत असं दिसत आहे. तिने अगदी तिच्या पतीला मुलाला भेटण्यापासूनही रोखलं आहे. पतीला त्याच्या पितृत्वाच्या हक्कांपासून या महिलेने वंचित ठेवलं आहे. पतीने मात्र पत्नीच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं दिसत आहे. मात्र पत्नी एकत्र राहण्यास तयार नाही. त्यामुळेच घटस्फोटाचा अर्ज आम्ही मंजूर करतोय, असं न्यायालयाने सांगितलं.