नवी दिल्ली : 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नवा कायदाच केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या जन्मदरामुळे वाढत चाललेल्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आसाम सरकारने एक नवा कायदा केला आहे. या कायद्यानुसार एका दाम्पत्याला जास्तीत जास्त दोन अपत्यांनाच जन्म देता येणार आहे. जर, एखाद्या दाम्पत्याने दोन पेक्षा अधिक अपत्ये जन्माला घातली तर, असे दाम्पत्य (अपत्याचे आई-वडील) सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरणार आहेत. तसेच, या दाम्पत्याला ग्रामपंचायत आणि नगरपालिकेची निवडणुकही लढविता येणार नाही. अर्थात, एखाद्या दाम्पत्याला आधी एक अपत्य असेल आणि दुसऱ्या वेळी जर जुळे बाळ जन्माला आले तर, कायद्यात शिथीलता आहे. पण, अशा घटना अपवादात्मक असतात.


अत्यंत वादळी चर्चेनंतर आसाम विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले. आसामचे आरोग्यमंत्री आणि कुटूंब कल्याणमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी हे विधेयक विधानसभेच्या पटलावर मांडले होते. ज्या वेळी या विधेयकावर चर्चा सुरू झाली तेव्हा सभागृहात वादळी चर्चा झाली. अखेर हे विधेयक पारीत झाले. विधेयक मंजूर झाल्यावर सरकारी नोकरीच्या नियमांमध्ये लवकरच नव्या कायद्यानुसार बदल करण्यात येतील, अशी माहितीही शर्मा यांनी दिली