धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजारोंचा जमाव
सोशल डिस्टन्शिंगचा फज्जा
मुंबई : भारतावरील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना आसाममध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्शिंगचा वापर करा. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असा सल्ला सतत दिला जात असतानाही आसाममधील नागाव जिल्ह्यात १० हजारांच्या संख्येनी लोकं एकत्र उपस्थित राहिली. यामुळे आसाममधील तीन गावांत शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
नागाव जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरू आणि आमदार अमीनूल इस्लाम यांचे वडील खैरूल इस्लाम यांच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल दहा हजार लोकं उपस्थित होते. ८७ वर्षांचे खैरूल इस्लाम यांच्यावर २ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधीला दहा हजार लोकं उपस्थित होते. प्रशासनाला माहिती मिळताच जवळील तीन गाव सील करण्यात आली.
আমাৰ আব্বাজান মৰহুম হজৰত আমীৰে শ্বৰীয়ত (উত্তৰ পুব ভাৰত), অসম ৰাজ্যিক দ্বীনি শিক্ষা ব'ৰ্ডৰ সভাপতি, সৰ্বভাৰতীয় জমিয়ত...
Posted by Aminul Islam, MLA - Dhing on Thursday, July 2, 2020
खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक हजर असल्याचं दिसतेय. नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार, अंत्यविधीसाठी कमीत कमी दहा हजार जणांची उपस्थिती होती.
यासंदर्भात पोलिसांनी दोन गुन्हे देखील दाखल केले आहेत, अशी माहिती नागावचे पोलीस उपायुक्त जदाव सैकिया यांनी दिली आहे. या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या लोकांनी लॉकडाऊनच्या काळातील कोणतेही नियम पाळलेले नाहीत. सोशल डिस्टन्शिंगचा येथे फज्जा उडाला आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी या ठिकाणी मास्कचाही वापर केलेला नाही.
आमदाराकडून सारवासारव
आमदार अमीनूल इस्लाम यांनी म्हटलं की, 'माझे वडील खैरूल इस्लाम हे अतिशय ख्यातनाम व्यक्ती होते. त्यांच्या अनुयायांची संख्याही मोठी आहे. खैरूल इस्लाम यांच्या निधनाची बातमी आम्ही प्रशासनाला तात्काळ दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधीची व्यवस्था करावी असे आम्ही सांगितले होते.'