Assam-Mizoram Border Dispute: महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी जखमी, 6 पोलीस जवान शहीद
महाराष्ट्राचा वाघ घायाळ, मिझोराम-आसाम सीमेवर तणावा दरम्यान लागली गोळी
नवी दिल्ली: आसाम आणि मिझोराम सीमेवरून तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा तणाव थांबण्याचं नावच घेत नाही. आतापर्यंत या तणावात 6 पोलीस शहीद झाले आहेत. सर्वात दु:खद बातमी ही की यामध्ये महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आसाममध्ये महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. आसाम-मिझोराम सीमेवर असलेल्या काचारचे जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायात गोळी लागली आहे. या भागामध्ये आसाम आणि मिझोराममध्ये सीमावाद आहे. त्यातूनच मिझोराममधून आसाम पोलिसांवर मोठा हल्ला झाला आहे.
पोलिसांवर गोळीबार आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती. यात किमान 6 पोलीस शहीद झालेत. तर 50 च्या आसापास पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून सीमावादावर शांततामय मार्गानं तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.