कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचा फोटो हटवण्यात येणार? नक्की कारण काय?
कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरुन (Corona Vaccine Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा फोटो हटवण्यात येणार असल्याचं समजत आहे.
मुंबई : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात येणार असल्याचं समजत आहे. आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोटो हटवण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (assembaly polls 2022 pm narendra modi picture will be removed corona vaccine certificate in 5 states with assembly elections changes will be made in cowin portal)
गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम शनिवारी 8 जानेवारीला निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. या पाचही राज्यांमधील कोविन App मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या राज्यांमधील App वरून फोटो हटवण्यासाठी आवश्यक फिल्टर टाकण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तयारी केली असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक
कोणत्या राज्यात केव्हा होणार मतदान?
यूपीत एकूण 7 टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14,20, 23, 27 फेब्रुवारीला पहिल्या 5 टप्प्यातील मतदान पार पडेल. तर 3 आणि 7 मार्चला अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या टप्प्यासाठी उमदेवाराचं भवितव्य मतपेटीत बंद होईल.
मणिपूरमध्ये केव्हा होणार मतदान?
मणिपुरात एकूण 2 टप्प्यात निवडणूका पार पडणार असून पहिला टप्प्यातील मतदान हे 27 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसरा टप्पातील मतदानप्रक्रिया 3 मार्चला पार पडेल.
तीन राज्यात एकाच टप्प्यात मतदान
दरम्यान पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान होईल.
म्हणून कोरोना सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो
कोरोना लस घेतल्यावर लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळतं. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असतो. आतापर्यंत सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र पंतप्रधानांचा फोटो प्रमाणपत्रावर असण्यामागचं कारण काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सांगितलं होतं.
"एप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं हा कोविडचा प्रसार रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या फोटोसह संदेश असणं हे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत करतं", असं उत्तर आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत बोलताना दिलं होतं.