Assembly Election 2022 : 2024 मध्ये `आप`चं थेट मोदींना आव्हान?
`इस बार, बस एक बार केजरीवाल` असं आवाहन आपने केलं होतं, आता आपचं लक्ष 2024
Assembly Election 2022 : गेले वर्षभर शेतकरी आंदोलन आणि काँग्रेसमधल्या अतंर्गत राजकारणाने चर्चेत असलेल्या पंजाबमध्ये यावेळी मोठा सत्ता बदल पाहिला मिळतोय. आम आदमी पक्षाच्या झाडुने पंजाबमध्ये सर्व पक्षांचा सफाया केला आहे.
पंजाबमध्ये सत्ता राखण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले, पण गेल्या वेळच्या निम्म्या जागांचा आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसला केवळ 18 जागांवर समाधान मानावं लागलं आहे इतकंच नाही तर मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिंह सिद्धू आणि सुखबीर सिंह बादल हे पंजाबमधले दिग्गज नेते पिछाडीवर पडले आहेत.
पंजाबमध्ये आपच्या झंझावातासमोर भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला तर दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
पंजाबमध्ये 'आप'चा चमत्कार
पंजाबमध्ये आपने जोरदार मुसंडी मारत 117 जागांपैकी तब्बल 88 जागांवर आघाडी घेतली. त्यामुळे पंजाबवर आता आप राज्य करणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया तसचं घरोघरी जाऊन प्रचार करत पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहचवला. आपमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात आहे.
अरविंद केजरीवाल देणार मोदींना आव्हान
पंजाबमध्ये आपने दिल्लीची पुनरावृत्ती केली आहे. बहुमत मिळवत आपने एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजानंतर आपचे प्रवक्ता दिलीप पांडे यांनी मोठं विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीनंतर पंजाब जिंकलं, आता 2024 मध्ये अरविंद केजरीवाल थेट पंतप्रधान मोदींना आव्हान देतील असं वक्तव्यही दिलीप पांडे यांनी केलं आहे.
पंजाबमध्ये केजरीवालांची आश्वासनं
पंजाब विधानसभेसाठी अरविंद केजरीवाल यांनी धडाक्यात प्रचार केला होता. आठभर त्यांनी पंजाबमध्ये तळ ठोकला होता. अमृतसर, जालंधर, मोहालीसह अनेक जिल्हे त्यांनी पिंजून काढले.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये दिले जातील, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं होतं. ही जगातील सर्वात मोठी महिला सक्षमीकरण मोहीम असेल असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं.
आता घरातील वडिल किंवा पती कोणाला मत द्यायचं हे सांगणार नाही, तर महिलाच ठरवतील कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, असं केजरीवाल यांनी ठणकावून सांगितलं होतं. सर्व महिलांनी घरात सांगा की 'इस बार, बस एक बार केजरीवाल'. केजरीवाल सरकारला एकदा संधी देऊन पाहा असं आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केलं होतं. संपूर्ण देशात वीज बिल शून्य करणं केवळ केजरीवालच करू शकतात, असंही केजरीवाल यांनी म्हटलं होतं.
भगवंत मान मुख्यमंत्री बनणार
पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांना आपचा चेहरा बनवलं होतं. भगवंत मान यांनी पंजाबच्या जनतेला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्याच्या मुद्द्यावर मतदान करण्याचं आवाहन केले होतं.
काँग्रेसच्या जागा घटल्या
पंजाबमध्ये सर्वात मोठा धक्का बसला आहे तो काँग्रेसला. 2017 मध्ये काँग्रेसला 77, अकाली दलाला 15 आणि आपला 20 जागा मिळाल्या होत्या.