जयपूर: राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेसकडून एक अनपेक्षित डाव खेळण्यात आला. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार, यावरुन पक्षात दोन तट पडले आहे. याचा फटका निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने भाजपला कोड्यात टाकणारी घोषणा केली. या घोषणेनुसार सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. मात्र, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 


राहुल गांधी यांचा आदेश आणि अशोक गेहलोत यांच्या विनंतीला मान देत मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पायलट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजपचे खासदार हरिश मीना यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


दरम्यान, आता पायलट आणि गेहलोत दोघेही निवडणूक लढवणार असल्याने सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर ठेवायचा हा पेच राहुल गांधींसमोर उभा राहिला आहे. 


राजस्थान काँग्रेसमधील गटबाजी ही काही नवीन नाही. मध्य प्रदेशाप्रमाणे निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्यास ऐन निवडणुकीत गटबाजीचा फटका पक्षाला बसू शकतो. याउलट पायलट आणि गेहलोत दोघांना विधानसभेच्या रिंगणात उतरवल्याने मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या इर्षेने दोन्ही नेते ताकदीने लढतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.