पश्चिम बंगाल, आसाम विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
पश्चिम बंगाल ( West Bengal) आणि आसाम (Assam) विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
कोलकाता : पश्चिम बंगाल ( West Bengal) आणि आसाम (Assam) विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांसाठी तब्बल 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होत आहे. तर शेवटच्या टप्प्याचं मतदान 29 एप्रिलला होणार आहे. (Assembly elections 2021: Phase 1 polling underway in 30 seats in West Bengal, 47 in Assam)
तर आसामच्या एकूण 126 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होताहेत. त्यातल्या 47 जागांचा पहिला टप्पा आज तर शेवटच्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल. सध्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपने सगळी ताकद पणाला लावली आहे.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात 21 महिलांसह 191 उमेदवारांचे भवितव्य निश्चित होईल. पहिल्या फेरीमध्ये पुरुलिया व झारग्राममधील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्बा मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूरमधील मतदारसंघात मतदान होणार आहे.
आसाममध्ये 47 जागांसाठी एकूण 264 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 42 जागा अप्पर आसाम आणि उत्तर आसाम विभागातील 11 जिल्ह्यांतील असून पाच जागा मध्य आसामच्या नागाव जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहेत.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहांनी इथे आपली ताकद पणाला लावली आहे. तर पाय फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेतही ममता बॅनर्जी सध्या प्रचाराच्या मैदानावर मोदी यांच्या विरोधात तोफा डागत आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. भाजपने याठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन करत तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर तृणमूलने भाजपला जोरदार टक्कर देत आपलीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा दावा केला आहे.