माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची दुसरी पुण्यतिथी, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांच्यासहित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील स्मृतीस्थळावर जाऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच गृहमंत्री अमित शाह देखील स्मृतिस्थळावर पोहोचले.
पंतप्रधानांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीवर श्रद्धांजली. भारत नेहमी त्यांची उत्कृष्ट सेवा आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना लक्षात ठेवेल. १.४९ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे.
अटलजींचे योगदान कोणी विसरु शकत नाही. त्यांच्या नेतृत्वात परमाणु शक्तीने देशाची मान उंचावली. पार्टी नेता, लोकसभा सदस्य, मंत्री किंवा प्रधानमंत्री असो..सर्वच भूमिकांमध्ये त्यांनी आदर्श निर्माण करुन ठेवलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी देशभक्ती आणि भारतीय संस्कृतीचा प्रखर आवाज होते. ते एक राष्ट्र समर्पित राजनेता असण्यासोबत कुशल संघटक देखील होते. भाजपची पायाभरणी करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांनी कोट्यावधी कार्यकर्त्यांना देशसेवेसाठी प्रेरित केलं.