अटल बिहारी वाजपेयी : व्यक्तीगत जीवन आणि साहित्य
ते नेहमी म्हणत, `मी अविवाहीत आहे, ब्रह्मचारी नाही`
मुंबई : स्मृतीभंशाच्या विकाराणे त्रस्त असलेले अटलजी सक्रीय राजकारणातून बाजूला पडल्याला आता काही वर्षे लोटली. पण, म्हणून भारतीय राजकारण आणि साहित्यातले त्यांचे स्थान तसूभरही कमी झाले नाही. आजही त्यांचे राजकारण आणि कविता राजकीय आणि साहित्य वर्तुळावर प्रभाव टाकून आहेत. अशा या उत्तंग व्यक्तिमत्वावर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चौटटीबद्ध मुशीत जडणघडण झालेल्या अटल बिहारी यांच्या नेतृत्वाने भारतीय राजकारणाचा तख्तपालट केला. भारतीय राजकारण आणि संसदेचे प्रदीर्घ काळ साक्षिदार राहिलेल्या अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे झाला. त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी शिक्षक होते. खरे तर, त्यांचा मूळ संबंध हा आगरा जिल्ह्यातील वटेश्वर गावाशी आहे. पण, त्यांचे वडील मध्य प्रदेशात शिक्षक होते. त्यामुळे अटलजींचा जन्म तेथे झाला. अटल बिहारींचा उत्तर प्रदेशवर विशेष जीव होता. आपल्या संसदीय कारकीर्दीत ते लखनौमधूनच खासदार राहिले आहेत.
सर्वसमावेशक नेता...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार होऊनही अटलजींचे राजकारण हे उदारमतवाद आणि समानतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. त्यांनी नेहमीच शांतता आणि निरपेक्षतेचा पुरस्कार केला. ते हिंदुत्ववादी जरूर होते. तरीही त्यांना देशातील विविधतेत एकात्मता हे सूत्र मान्य होते.
कवी मनाचा राजकारणी..
अटलजी उत्कृष्ट राजकारणी (राजकीय नेता) आहेत. तसेच ते उत्कृष्ठ कवीसुद्धा आहेत. माझी कविता ही युद्धाचे रणशिंग फुंकते तिला पराभवाची प्रस्तावना आवडत नाही, असे ते मोठ्या अभिमानाने सांगायचे. त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रचंड गाजले. त्यापैंकी मेरी इक्यावन कविताए, मृत्यु या हत्या, अमर बलिदान (लोकसभेतील अटलजींच्या वक्तव्यांचा संग्रह), कैदी कविराय की कुण्डलियाँ, संसद में तीन दशक, अमर आग है, कुछ लेख: कुछ भाषण, सेक्युलर वाद, राजनीति की रपटीली राहें, बिन्दु बिन्दु विचार ही त्यांची पुस्तके विशेष गाजली...
केवळ एका मताने पडले सरकार, सोडले पंतप्रधान पद
दरम्यान, अटल बिहारी यांनी काँग्रेसला विशेषत: गांधी घराण्याच्या राजकारणाला जोरदार टक्कर दिली. काँग्रेसला विरोधी पक्षाचे सरकार सत्तेत आणणे ही साधी बाब नव्हती. लोकशाही आणि संसदीय राजकारणाला कोणताही धक्का न लावता अटल बिहारी यांनी सत्तापालट केला. केंद्रात सत्ता मिळविण्याचे त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, अनेकदा त्यांना अपयश आले. एकदा तर १९९६ मध्ये अटलजींचे केंद्रातील सरकार केवळ एका मताने पडले होते. पुरेशा संख्याबळाअभावी त्यांना दोन वेळा पंतप्रधानपद सोडावे लागले. मात्र, अखेर त्यांनी आघाडीच्या राजकारणाचा पुरस्कार केला आणि केंद्रात काँग्रेसेत्तर सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे हे सरकार आघाडीचे सरकार असूनही त्यांनी ते पूर्ण काळ चालवले.
म्हणून घेतला अविवाहित राहण्याचा निर्णय...
व्यक्तिमत्व जितके मोठे तितके त्याबाबतचे समज, गैरसमज आणि अफवा अनेक... त्यामुळे त्यांच्या आयुष्यभर अविवाहीत राहण्याची अनेकदा चर्चा होते. मात्र, प्राप्त माहिती अशी की, आपले जीवन देशासाठी आणि खास करून राजकीय सेवेसाठी वाहून घेण्याचे अटलजींनी ठरवले होते. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करण्यासाठी वेळ मिळावा यासाठीह त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचे ठरवले, असेही सांगितले जाते. परंतु, अटलजींचं एक वाक्य प्रसिद्ध आहे... ते नेहमी म्हणत, 'मी अविवाहीत आहे, ब्रह्मचारी नाही'
पत्रकार झाला पंतप्रधान
सुरूवातीच्या काळात एक कवी, संघ स्वयंसेवक अशी ओळख असलेल्या अटल बिहारींनी पत्रकारीताही केली आहे. पुढे आपले अखंड आयुष्य राजकारणासाठी व्यतीत केले असले तरी, अटलजींनी सुरूवातीच्या काही काळात पत्रकारीता केली आहे. त्यांनी संघाचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या पांचजन्य, राष्ट्रधर्म, वीर अर्जुन यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये पत्रकारीता केली. १९५७ मध्ये देशाच्या संसदेत जनसंघाचे केवळ 4 सदस्य होते. ज्यात अटल बिहारींचा समावेश आहे.
अटल बिहारींचे वैशिष्ट्य असे की, संयुक्त राष्ट्र संघामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करताना राष्ट्रभाषा हिंदीतून भाषण देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.