सबरीमला मंदिर महिला प्रवेश : समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला
सबरीमला मंदिरात महिला प्रवेशाच्या आदेशाचं समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केलाय.
तिरूवनंतपुरम : सबरीमला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिला प्रवेशाच्या आदेशाचं समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केलाय. यामध्ये आश्रमातली काही वाहनं समाजकंटकांनी पेटवली.
तिरूवनंतपुरमच्या कुंदमंकडवू इथल्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर काही अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन कार, एक दुचाकी जाळण्यात आल्यात. स्वामी गिरी हे भगवतगिता स्कूलचे संचालक आहेत. एखाद्या गोष्टीचा वैचारिकदृष्ट्या सामना करता येत नसेल तेव्हाच असे हल्ले केले जातात अशी प्रतिक्रिया केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिलीय.
केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीधरन पिल्लई, थाजोमन तंत्री आणि पंडलम रॉयल फॅमिलीचा या हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप स्वामी गिरी यांनी केलाय. लोकांना सत्य सांगण्याऱ्यांना उध्वस्त करण्याचा यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री विजयन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. जेव्हा वैचारिक लढा देता येत नाही तेव्हाच अशा प्रकारचे हल्ले होतात असे त्यांनी म्हटले आहे.कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.