डेन्मार्कच्या पंतप्रधानांवर हल्ला! मोदी म्हणाले, `घटनेनंतर मी खूप चिंतेत..`
Attacked on Denmark PM: घटनेनंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांना तातडीने तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Attacked on Denmark PM: भारतात नुकत्याच लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले असून उद्या पंतप्रधान पदाचा शपथविधी होणार आहे. दुसरीकडे डेन्मार्कमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्यावर अचानक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेनंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांना तातडीने तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंतप्रधानांवर हल्ला झाल्याच्या या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे.
मोदींकडून हल्ल्याचा निषेध
नरेंद्र मोदी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया साइट 'एक्स'वर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावरील हल्ल्याच्या बातमीने मी अत्यंत चिंतेत आहे. मी या हल्ल्याचा निषेध करतो. मी त्यांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
मेटे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अटक
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे यांच्यावर शुक्रवार, 7 जून रोजी हल्ला झाला. कोपनहेगनच्या कल्चरवेट (स्क्वेअर, रेड) येथे संध्याकाळच्या वेळेत एका व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. काही वेळातच हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
डॅनिश पंतप्रधान कार्यालयाने काय म्हटले?
पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी कोपनहेगनच्या कल्चरवेट (स्क्वेअर, रेड) मध्ये एका व्यक्तीने हल्ला केला होता. ज्याला नंतर अटक करण्यात आली. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून कोणती अधिक माहिती देण्यात आली नाही. या घटनेने पंतप्रधानांना धक्का बसला आहे.
पंतप्रधान मोदी इटली दौऱ्यावर
पंतप्रधान पदाची शपथ झाल्यानंतर मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी इटलीला जाणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या पंतप्रधानांना G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. ते पंतप्रधानांनी स्वीकारले आहे. 13 ते 15 जून दरम्यान इटलीमध्ये G7 देशांची शिखर परिषद होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी देशाचे प्रतिनिधित्व करतील. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. मोदींनी गुरुवारी इटालियन पंतप्रधान मेलोनी यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान इटलीतील पुगलिया येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.