खुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार
खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
नवी दिल्ली : खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. पण आता नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंट आपोआप टान्सफर होणार आहे. सोमवारपासून ऑटो पीएफ ट्रान्सफर सुविधेला सुरुवात झाली आहे. ईपीएफओचा हा निर्णय खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. या निर्णयामुळे नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी महिनोंमहिने वाट बघावी लागणार नाही.
ऑटो पीएफ ट्रान्सफरचा जवळपास ५ कोटी नागरिकांना फायदा मिळेल, असा विश्वास ईपीएफओनं व्यक्त केला आहे. सध्या ऑटो पीएफ ट्रान्सफर सुविधेची ट्रायल सुरु आहे. ही ट्रायल यशस्वी होत आहे. याआधी नोकरी सोडल्यावर पीएफ ट्रान्सफर करताना फॉर्म १३ भरावा लागत होता. हा फॉर्म एचआरकडून पीएफ ऑफिसला जात होता. पीएफ ऑफिस हा फॉर्म कर्मचाऱ्याच्या जुन्या पीएफ ऑफिस/झोनला पाठवण्यात यायचा. फॉर्म व्हेरिफिकेशननंतर जवळपास दोन महिन्यांनंतर हा फॉर्म परत यायचा आणि मग पीएफ ट्रान्सफर व्हायचा.
आता मात्र फॉर्मवर कर्मचाऱ्याला त्याचा यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजेच यूएएन आणि इतर माहिती दिल्यावर लगेचच पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर होणार आहे. कर्मचाऱ्यानं नोकरी बदलली तर कोणत्याही अर्जाशिवाय तीन दिवसांमध्ये पीएफ ट्रान्सफर करण्याचा ईपीएफओचा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्याकडे आधार आयडी आणि व्हेरीफाईड आयडी असेल तर तो देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात नोकरी करत असेल तर ऍप्लिकेशनशिवाय पीएफ ट्रान्सफर होणार आहे.