श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुलगामा जिल्ह्यात गुरूवारी हिमस्खलन झाले. जवाहर सुरंगजवळील श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात १० पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी पोलिसांसह एनडीआरएफचे जवानही दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवाहर सुरंगजवळ गुरूवारी अनेक पोलीस कर्मचारी हिमस्खलनात अडकले गेले. त्यावेळी काही पोलिसांना बाहेर काढण्यात आले परंतु १० पोलीस त्यात दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या २४ तासांत कुलगाम जिल्ह्यात सर्वाधिक हिमवर्षाव झाला आहे. खराब हवामानामुळे जम्मूहन जाणाऱ्या १३ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 




जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठी बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तराखंडच्या टेकड्यांवर हिमवर्षावानंतर यमुनोत्री आणि गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. उत्तराखंडमधील बर्फवृष्टीनंतर जिल्ह्यातील अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिमला तसेच मनालीतही बर्फवृष्टी सुरू आहे. सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना बर्फाच्छादित भागात न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.