दिल्लीत कोरोना व्हायरसची दहशत; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दिल्लीत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
नवी दिल्ली: संपूर्ण जगात थैमान घालत असलेला #Coronavirus आता दिल्लीच्या वेशीवर येऊन पोहोचला आहे. दिल्लीतील ITBP कॅम्पमध्ये कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आल्यानंतर सरकारी यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यंदा होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे मोदींनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे, असा सल्ला अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आपण यंदा होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय पातळीवरही कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दिल्लीत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये #Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा झाली. एकूणच #Coronavirus मुळे दिल्लीतील वातावरणात आता तणाव दिसायला सुरुवात झाली आहे.
#Coronavirus ची लागण झालेल्या दिल्लीतील लोकांमध्ये प्रामख्याने इटलीतून आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे. इटलीमधून आलेल्या २१ पैकी १५ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. AIIMS ने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. या सर्व पर्यटकांना मंगळवारी संध्याकाळपासून दिल्लीच्या ITBP कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे.