नवी दिल्ली : राजकीयदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील बाबरी मशीद प्रकरणाची दररोज सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी सुनावणी पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. या खटल्यातील विशेष न्यायाधीश निकाल देईपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्याबाबतच्या यंत्रणेबाबत न्यायालयास १९ जुलैपर्यंत माहिती द्यावी असे निर्देश न्या. आर. एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने राज्य सरकारला १६ जुलैला दिले होते. त्यावर आज सुनावणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष न्यायधीशांनी २५ मेला सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून आपण ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत असल्याचे कळवले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह भाजपचे खासदार विनय कटियार, साध्वी ऋतंबरा या अन्य आरोपींवर १९ एप्रिल २०१७ रोजी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 


अयोध्या रामजन्मभूमीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दोन ऑगस्टपासून दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी न्यायालयाने २ ऑगस्ट ही  तारीखही जवळपास निश्चित करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांच्या खंडपीठासमोर ही दररोज सुनावणी होईल, असेही न्यायालयाने काल स्पष्ट केले. दरम्यान, अयोध्या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ समितीने काल आपला प्रगती अहवाल सादर केला. त्यानुसार ही सुनावणी दररोज होणार आहे.