नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी जनतेने भाजपाच्या पारड्यात विजयी मोहोर टाकली आणि देशात अनेक वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमताने एकाद्या पक्षाला नागरिकांची पसंती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वाट्याला हे यश आलं. विरोधकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. पण, विरोधकांच्या यादीत असणाऱ्या काही बड्या नेत्यांनी मात्र मोदींच्या आणि पर्यायी भाजपाच्या विजयावर नाराजीचा सूर आळवला आहे. बहुजन समाज पार्टी/ पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी हा जनतेच्या भावनेचा पराभव असल्याची प्रतिक्रिया दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांविषयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं. 'आजचा निकाल हा जनतेच्या अपेक्षा आणि भावनांविरोधातील आहे. कारण, ज्यावेळी देशातील सर्व स्वायत्त संस्थाच सत्ताधारी सरकारपुढे गुडघे टेकू लागतात, शरणागती पत्करु लागतात तेव्हा मग जनतेलाच पुढाकार घ्यावा लागतो', असं त्या म्हणाल्या. मोदींचा विजय हा जनभावनेचा पराजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 



मयावती यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी आळवलेला नाराजीचा सूर स्पष्टपणे लक्षात आला. मायावती यांच्याप्रमाणेच एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपाच्या या विजयावर नकारात्मक सूर आळवला आहे. हिंदू विचारसरणीतच फेरफार केल्याचं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. त्यामुळे एकिकडे पंतप्रधानांच्या नव्या कार्यकाळासाठी संपूर्ण देशाच्या बहुतांश भागातून जल्लोष पाहायला मिळत असतानाच विरोधकांच्या मनात असणारी सल मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.