नवी दिल्ली : आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडु, केरळ, पुदुच्चेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. पाचही राज्यात 6 नेत्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, पलानीस्वामी, सर्वानंद सोनोवाल, पी विजयन आणि कैलास विजयवर्गीय यांच्या मतांकडे आज साऱ्या देशाचे लक्ष असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 वाजल्यापासून मतगणना सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममता बॅनर्जींचा गड असलेला हुगळी, कोलकाता आणि दक्षिण आणि उत्तर 24 परगना या भागात त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  तर काँग्रेसचा गड असलेल्या मालदा मुर्शिदाबाद, राजगंज, दिनारपूर इथून हा तोटा भरुन काढला जाऊ शकतो. या ठिकाणी टीएमसी कधी जिंकली नाही. म्हणजेच टीएमसीनं कधीच न जिंकलेल्या जागा त्यांना जिंकाव्या लागतील. हा भाग बांग्लादेशच्या सीमेवरचा आहे.


ममता बॅनर्जींसाठी मालदा आणि मुर्शिदाबाद हा भाग महत्त्वाचा आहे. कारण याच भागात काँग्रेसला 44 च्या आसपास जागा मिळाल्या होत्या. याच भागात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. इथून आपला तोटा ममता भरून काढू शकतील. ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांना आवाहन केलं होतं की मतं वाया घालू नका. त्यामुळे इथला मुस्लिम मतदार काँग्रेस ऐवजी ममता बॅनर्जींना मत देईल अशी शक्यता आहे.



ममता बॅनर्जी जिंकल्या तर 2024 च्या लोकसभा निवडणूकीचं नेतृत्व त्यांच्याकडे जाईल. असे न झाल्यास पक्षात बंडखोरी होईल आणि भाजप टीएमसी फोडेल असं म्हटलं जातंय. 


काँग्रेसचा मतदार टीएमसीकडे शिफ्ट होईल का ?, महिला मतदार ममतांकडे राहणार का ? मुस्लिम मते एकगट्ठा टीएमसीच्या पाठीशी राहतील का ? टीएमसी आपला पारंपारिक गड राखणार का ? डाव्या पक्षांचा ममता बॅनर्जींना किती फटका बसणार? या प्रश्नांवर टीएमसीचं भवितव्य अवलंबून आहे.