बँक कर्मचाऱ्याने ग्राहकांसोबत असं कृत्य केल्यास कारवाई झालीच समजा! आरबीआयचे नियम जाणून घ्या
आता बँकेच्या कर्मचाऱ्याने तुमच्या कामासाठी टाळाटाळ केली, तर तुम्ही त्याची तात्काळ तक्रार करू शकता.
Bank Rules: आपण बँकेत गेल्यानंतर अनेकदा आपल्याला ताटकळत राहावं लागतं. सरकारी बँकांमध्ये तर हे प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे बँकेचं काम म्हटलं की अर्धा दिवस गेला असंच समजावं लागतं. अनेकवेळा बँकेत गेल्यावर कर्मचारी दुपारच्या जेवणानंतर यायला सांगतात, तर कधी जेवणानंतरही तासंतास थांबावे लागते. तुमच्यासोबतही असं झालं असेल तर ही बातमी नक्की वाचा. आता बँकेच्या कर्मचाऱ्याने तुमच्या कामासाठी टाळाटाळ केली, तर तुम्ही त्याची तात्काळ तक्रार करू शकता. यासाठी आरबीआयने नियम तयार केले आहेत.
अनेकदा कर्मचारी काम टाळण्याचा प्रयत्न करतात. पण आता ग्राहकांना बँकिंग सेवेशी संबंधित काही अधिकार मिळाले आहेत. बँकेने ग्राहकांशी नीट वागणे महत्त्वाचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, जर ग्राहकांना योग्य वागणूक दिली गेली नाही तर तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता आणि तुमची समस्या मांडू शकता.
बँक ग्राहकांना अधिकार
कोणत्याही बँक कर्मचाऱ्याने तुमचे काम करण्यास उशीर केला किंवा टाळण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्या बँकेच्या व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसरकडे तक्रार करू शकता.
ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी जवळपास प्रत्येक बँकेत तक्रार निवारण मंच असतो, जिथे तुम्ही तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकता.
तक्रार कुठे करायची?
तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल त्या बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तुम्ही संबंधित कर्मचाऱ्याची तक्रार करू शकता. याशिवाय बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता. काही बँका ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधाही देतात.
उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक 1800-425-3800/1-800-11-22-11 या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही शाखेतील कर्मचाऱ्याबद्दल तक्रार करू शकतात. त्याच वेळी, तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असल्यास, तुम्ही बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर किंवा अपील प्राधिकरणाशी संपर्क साधू शकता.
बँकिंग लोकपालाकडे तक्रार करा
याशिवाय, जर तुम्हाला बँकिंग लोकपालकडे बँक कर्मचार्यांची तक्रार नोंदवायची असेल, तर तुम्ही कॉल करून किंवा ऑनलाइन करून तुमची तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉग इन करा.
त्यानंतर File A Complaint वर जा. किंवा CRPC@rbi.org.in वर मेल पाठवून तुमची समस्या देखील नोंदवा.
बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 14448 हा टोल फ्री क्रमांक असून त्यावर कॉल करूनही ग्राहक तक्रारी करू शकतात.