पुढच्या आठवड्यात लागोपाठ ४ दिवस बँका बंद
सरकारकडून १० बँकांच्या विलिनिकरणाविरोधात बँक युनियननी संपाचं हत्यार उपसलं आहे.
मुंबई : सरकारकडून १० बँकांच्या विलिनिकरणाविरोधात बँक युनियननी संपाचं हत्यार उपसलं आहे. बँक यूनियनकडून २६ आणि २७ सप्टेंबरला संपाची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर २८ सप्टेंबरला चौथा शनिवार असल्यामुळे आणि २९ सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. या संपामध्ये ४ बँक युनियन सहभागी झाल्या आहेत.
या बँक युनियननी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA)ला विलिनिकरणाविरोधात संप करणार असल्याची नोटीस दिली आहे. ३० ऑगस्टरोजी सरकारने १० बँकांचं ४ बँकांमध्ये विलिनिकरण करणार असल्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट येऊ शकतं अशी भीती बँक युनियननी व्यक्त केली आहे. पण या विलिनिकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, असं आश्वासान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही या बँकांनी दिला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिसर्स या युनियननी एकत्र संपावर जाण्याची नोटीस दिली आहे. बँक युनियननी ५ दिवसाचा आठवडा आणि रोख रक्कम देवाण-घेवाणीचे तास कमी करण्याची मागणी केली आहे.
बँकांमध्ये बाहेरच्या यंत्रणांचा हस्तक्षेप रोखणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे मुद्दे सोडवणे, बँकांमध्ये भरती करणे, एनपीएस संपवणे, ग्राहकांसाठीचा सेवा कर कमी करणे, खराब कामगिरीचं कारण देऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करु नये, अशा इतर मागण्याही युनियननी केल्या आहेत.
पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचं विलिनिकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या विलिनीकरणानंतर ही देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक ठरणार आहे. दरम्यान, कॅनरा आणि सिंडिकेट बँक यांचे देखील विलीनीकरण केले जाईल. इंडियन आणि अलाहाबाद बँक यांचेही विलिनीकरण करण्यात येणार आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनिकरण होईल.