मुंबई - जर तुम्ही बॅंकांची काही कामे येत्या दोन-तीन दिवसांत करण्याचे ठरवले असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण येत्या २६ तारखेपर्यंत बॅंकांचे कामकाज नियोजित संपामुळे कोलमडणार आहे. बॅंकांच्या दोन वेगवेगळ्या संघटनांनी अनुक्रमे २१ आणि २६ डिसेंबरला आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्याचबरोबर चौथा शनिवार असल्यामुळे २२ डिसेंबरला बॅंका बद आहेत. रविवार असल्यामुळे २३ डिसेंबरला सुटी आहे. त्याचबरोबर नाताळसाठी २५ डिसेंबरलाही सुटी असल्याने बॅंक बंदच राहणार आहेत. यामुळे फक्त एक दिवस २४ डिसेंबरला बॅंकांचे कामकाज सुरू राहिल. त्यानंतर पुन्हा २७ तारखेपासून कामकाज सुरूळीत होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेतनाच्या मुद्द्यावरून बॅंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने २६ डिसेंबरला संपाची हाक दिली आहे. पण त्याआधी बॅंक अधिकाऱ्यांच्या एका संघटनेने उद्या, शुक्रवारी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाचे कामकाज कोलमडणार आहे. बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंक यांच्या विलिनीकरणाविरोधात तसेच श्रेणी एक ते सातमधील अधिकाऱ्यांचे वेतन वाढविणे, पाच दिवसांचा आठवडा करणे आणि योग्य पेन्शन योजना यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संघटनेचे ३.२ लाख अधिकारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत, असे संघटनेचे सहायक सरचिटणीस संजय दास यांनी सांगितले.


या सर्व संप आणि सुट्यांमुळे सार्वजनिक बॅंकांचे कामकाज शु्क्रवारपासून बुधवारपर्यंत कोलमडणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आजच आपली कामे करून घेणे फायद्याचे ठरणार आहे.