पंतप्रधानांच्या नावाने मते मागणाऱ्यांना चप्पलने मारा... श्री राम सेनेच्या प्रमुखांचे वक्तव्य
karnataka Assembly Election : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक बड्या नेत्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच हिंदुत्ववादी संघटनेकडूनच अशी विधाने समोर येत आहेत
karnataka Election : महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकात (karnataka) सध्या निवडणुकांचे वारे वाहायला लागेलत. थोड्याच दिवसांत कर्नाटकात विधानसभा निवडणुका (assembly election) पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. अशातच कर्नाटकातील श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक (pramod muthalik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजप (BJP) नेत्यांवर निशाणा साधला आहे. प्रमोद मुथालिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
कारवारमध्ये प्रमोद मुथालिक यांनी हे वक्तव्य केले आहे. घरोघरी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले तर भाजप नेत्यांना चप्पलने मारहाण करावी, असे विधान प्रमोद मुथालिक यांनी केले आहे. मुथालिक यांनी 23 जानेवारी रोजी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे नाव आणि फोटो न वापरता मते मिळवून दाखवण्याचे आव्हान देखील दिले आहे.
काय म्हणाले प्रमोद मुथालिक?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, "यावेळी मोदी यांचे नाव न घेता मते मागून दाखवा. पॅम्प्लेट आणि बॅनरवर मोदींचा फोटो लावू नका. मतदारांना सांगा की तुम्ही विकास केला, गायी वाचवल्या, हिंदुत्वासाठी काम केले. छाती ठोकून मते मागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितकं काम केले आहे त्याच्या आधारे मते मागा. पंतप्रधानांचे नाव न घेता मते मागितल्याशिवाय तुमचे काही होणार नाही. मग ते तुमच्या दारात येतील. म्हणतील तुमचं मत मोदींना द्या. त्यांनी मोदींचे नाव घेतले तर त्यांना चप्पलने मारा. तेहे फालतू लोक मोदींचे नाव घेतात पण त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न त्यांना कधीच समजणार नाहीत," असे प्रमोद मुथालिक म्हणाले.
पोलिसांतही केली तक्रार
मुथालिक यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल करून कर्नाटकातील करकला विधानसभा मतदारसंघातील हेब्री तालुक्यातील शिवपुरा गावातील कथित 'बेनामी' जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही मुथालिक यांनी दावा केला होता की, मला भाजपच्या काही नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी मला आर्थिक मदत देखील दिली होती. निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरून मागे हटण्यासही त्यांनी आता नकार दिला आहे.
अमित शाह यांच्या नेत्यांना सूचना
निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांना काँग्रेस आणि जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या जुन्या म्हैसूरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. शाह यांनी पदाधिकाऱ्यांना भाजप राज्यात पहिल्या क्रमांकावर येईल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.