नवी दिल्ली : २०१२ साली देशाला हादरवणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पवन, अक्षय, मुकेश, विनय या चारही दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आलं. याआधीच्या तीन डेथ वॉरंटना आव्हान देऊन तीनदा फाशी टाळण्यात यशस्वी झालेल्या दोषींच्या वकिलांना चौथ्यावेळी मात्र यश आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाशीच्या आधी रात्रभर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावून फाशीला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न दोषींच्या वकिलांनी केला खरा, पण फाशी देण्यास अवघे दोन तास उरले असताना रात्री ३.३० वाजण्याच्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली आणि क्रूरकर्म्यांना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला.


निर्भया प्रकरणातील दोषींचे वकील अँडव्होकेट ए. पी. सिंग यांनी गुरुवारी उशिरा हायकोर्टात याचिका दाखल करून फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली. दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयालाही त्यांनी आव्हान दिलं. 


रात्री ९ वाजता हायकोर्टात सुनावणी सुरु होऊन रात्री उशिरा हायकोर्टानं याचिका फेटाळली. त्यानंतर रात्री उशिरा दोषींच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 


मध्यरात्रीनंतर अडीच वाजता म्हणजे दोषींना फाशी देण्यास अवघे ३ तास उरले असताना सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहताही रात्री उशिरा कोर्टात दाखल झाले. 


निर्भयाची आई आणि कुटुंबीयदेखिल सुप्रीम कोर्टात पोहचले आणि त्यानंतर तासभर कोर्टात सुनावणी चालली.   


तासाभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली आणि फाशीला अवघे दोन तास उरले असताना दोषींचा शेवटचा प्रयत्न असफला झाला.


तिहार जेलमध्ये रात्रभर फाशीची तयारी, अशी दिली फाशी


रात्रभर तिहार जेलमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. सुरक्षा कर्मचारी चारही दोषींवर सातत्यानं नजर ठेवून होते. सुप्रीम कोर्टाच याचिका फेटाळली गेल्यानंतर फाशीसाठी नियुक्त केलेल्या पवन जल्लादला उठवण्यात आलं. 


फाशी देण्याच्या तासभर आधी जेल प्रशासनाची पुन्हा एकदा बैठक झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमनं चारही दोषींची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तिहार जेलमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं.  


फाशी देण्याच्या सुमारे १५ मिनिटं आधी चारही दोषींना फाशी कोठडीत नेण्यात आलं. प्रत्येक दोषीबरोबर १२ सुरक्षा कर्मचारी होते. ४८ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कडेकोट व्यवस्थेत त्यांना फाशी कोठडीत नेण्यात आलं. त्यांच्या तोंडावर काळा कपडा घालण्यात आला. 


फाशी देण्याच्या १० मिनिटं आधी चौघांना फाशीच्या तख्तावर उभं करण्यात आलं. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधण्यात आले. त्यानंतर जल्लाद पवननं चौघांच्या गळ्यात फाशीचा दोर घातला. 


चौघांनाही डेथ वॉरंट वाचून दाखवण्यात आलं. बरोबर ५.३० वाजता चौघांना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आलं. दोघांनाही फाशी दिल्यानंतर नियमाप्रमाणे अर्धा तास चौघांनाही फासावर लटकवत ठेवण्यात आलं. सकाळी ६ वाजता डॉक्टरांनी तपासणी करून चौघांनाही मृत घोषित केलं.


फासावर लटकवल्यानंतर पुढे काय?


सकाळी ८ वाजता दिनदयाळ उपाध्याय रुग्णालयात चौघांचं शवविच्छेदन होईल आणि चौघांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवले जातील.


वैद्यकीय रिपोर्ट मिळताच जेलचे अधीक्षक ब्लॅक वॉरंटवर सही करतील आणि त्याला मृत्युचा दाखला जोडून चौघांनाही फाशी दिली गेल्याची माहिती कोर्टात पाठवली जाईल.