हवं तेवढं कर्ज आणि एफडीवर व्याज, चक्क भिकाऱ्यांची बँक, बघा कुठे चालते ही बँक
आतापर्यंत ज्यांनी दुसऱ्यांकडून घेतलं, तेच आता दुसऱ्यांना भरभरुन मदत करतायेत, पाहा भिकाऱ्यांची बँक जी इतरांना कर्ज देते
Beggars Bank in bihar : तुम्ही कधी ऐकलं का भिकाऱ्यांचीही बँक असू शकते? किंवा भिकाऱ्यांनी बँकेत खातं उघडून व्यवहार केल्याचं कधी तुमच्या पाहण्यात आलं आहे का? पण चक्क भिकाऱ्यांची बँक आहे आणि त्यात भिकारी भिक मागून मिळालेले पैसेही जमा करतात.
बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये भिकाऱ्यांनी भिकाऱ्यांसाठी बँक सुरु केली आहे. भिक मागून मिळालेले पैसे ते या बँकेत जमा करतात. विशेष म्हणजे यावर त्यांना व्याजही दिलं जातं. तसंच गरज पडल्यास त्यांना कर्जही उपलब्ध करुन दिलं जातं. भिकाऱ्यांशिवाय या बँकेत आर्थिक परिस्थिती चांगली नसणाऱ्या फेरीवाले आणि रिक्क्षावाल्यांचंही खातं आहे.
या बँकेच्या कामकाजाची प्रक्रियाही ठरलेली आहे. 175 भिकाऱ्यांनी पाच स्वतंत्र बचत गट स्थापन केले आहेत. हा बचतगट दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी भेटतो. बैठकीत भविष्यातील योजनांचे नियोजन केलं जातं.
स्थानिक महिला ललिता देवी पैशांच्या कमतरतेमुळे आपल्या मुलीचं लग्न करु शकत नव्हती. यावेळी त्यांना भिकाऱ्यांच्या बँकेतून 20 हजार रुपयांचं कर्ज मिळालं. ज्यातून त्यांना आपल्या मुलीचं लग्न करता आलं. तर मोहन राय आणि दिनेश साहनी यांना बँकेकडून मिळालेल्या पैशातून आपल्या मुलांवर उपचार करता आले.
व्यवस्थापक, कॅशियर, सचिव, एजंट आणि सभासद यांच्या माध्यमातून बँकेचा कारभार चालतो. पदांवरील व्यक्तीही व्यवसायाने भिकारीच आहेत. बँकेची कार्यपद्धती आणि दैनंदिन कारभार समजेल इतपत त्यांना शिकवण्यात आलं आहे. सभासदांना आवश्यकतेनुसार बँकेतर्फे आर्थिक मदत देण्यात येतं.
या बँकेची माहिती मिळताच आता सरकारकडूनही मदत मिळणार असल्याचं क्षेत्र समन्वयक निपेंद्र कुमार यांनी सांगितलं. विशेष कर्ज आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गट खाती उघडण्याच्या प्रक्रियेसाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री भिक्षेवृत्ती योजनेंतर्गत मानसिक स्वस्थ असणाऱ्या भिकाऱ्यांना आर्थिक कर्ज दिलं जातं, जेणेकरून त्यांना भीक न मागता भाजीच्या गाड्या, रिक्षा इत्यादी स्वयंरोजगार करता येईल.